
चित्ररथावर उल्हासनगरच्या रोबोटला स्थान
उल्हासनगर, ता. २२ (वार्ताहर) : मुंबईत २६ जानेवारी रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमाच्या देखाव्यावरील चित्ररथावर उल्हासनगरातील ड्रेनेजला क्लीन करणाऱ्या बांडीकूट (रोबोट) यंत्राला स्थान मिळाले आहे. हा पालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा असल्याचे गौरवोद्गार आयुक्त अजीज शेख यांनी काढले आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या नागरी विकास संचनालय यांच्याकडून महानगरपालिकेला पत्र मिळाले आहे. त्यात प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी रोजी होणाऱ्या मुंबई येथील शासकीय सोहळ्यात नगरविकास विभागाच्या चित्ररथावरील देखाव्यामध्ये सादरीकरण करण्यासाठी उल्हासनगर महानगरपालिकेच्या वापरात असलेल्या बांडीकूट (रोबोट) यंत्राचा समावेश निश्चित करण्यात आला आहे. हे यंत्र चालकासह उपलब्ध करून द्यावे, असे पत्रात कळवले असल्याची माहिती आयुक्त अजीज शेख यांनी दिली. या वेळी अतिरिक्त आयुक्त डॉ. करुणा जुईकर, उपायुक्त डॉ. सुभाष जाधव, शहर अभियंता प्रशांत सोळंके, पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता राजेश वानखेडे उपस्थित होते. नागरी विकास संचालनालय यांच्याकडील पत्रानुसार बांडीकूट (रोबोट) यंत्र शासकीय सोहळ्यासाठी पाठवण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे पाणीपुरवठा विभागाचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी सांगितले.
-----------------
कथा पालिकेच्या रोबोटची
उल्हासनगर शहरात साडेतीन ते चार हजाराच्या आसपास ड्रेनेज असून ते तुंबल्यावर गटारगंगेचे पाणी रोडच्या मधोमध वाहताना दिसत होते. नागरिक आणि वाहने याच गटारगंगेच्या पाण्यातून मार्ग काढत होते. सफाई कामगारांना नेहमीच ड्रेनेज साफ करण्यासाठी कसरत करावी लागत होती. हे चित्र बघून दीड वर्षापूर्वी रिजन्सी निर्माणचे महेश अग्रवाल, उद्धव रूपचंदानी, अनिल बठीजा आणि टाटा ट्रस्टने उल्हासनगर महागरपालिकेला ड्रेनेज सफाईसाठी दोन रोबोट दिले होते. त्यानंतर टाटाने २१ डिसेंबर २०२२ रोजी पुन्हा एक रोबोट पालिकेला दिला आहे.
---------
मुख्यमंत्र्यांकडून रोबोटचे कौतुक
सप्टेंबर २०२२ मध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये स्वच्छ महाराष्ट्र मिशन अर्बन या कार्यक्रमात राज्यातील सर्व महानगरपालिकांनी त्यांच्या नवनवीन कल्पनांचे सादरीकरण केले होते. त्यात उल्हासनगर पालिकेच्या वतीने ड्रेनेज सफाई करणाऱ्या नावीन्यपूर्ण रोबोटचे सादरीकरण केल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोबोटचे कौतुक करून आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता राजेश वानखेडे यांना शाबासकी दिली होती.