
पालघर जिल्ह्यात ‘रंगोत्सव’
वसई, ता. २२ (बातमीदार) : ‘सकाळ’ने आयोजित केलेल्या बालचित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत आपल्या कलेची चुणूक दाखवली. यावेळी मूक व कर्णबधिर दिव्यांगांसह जिल्ह्यात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. ही स्पर्धा अ, ब, क आणि ड या चार गटांत पार पडली. यावेळी दिलेले विषय निवडून चित्र काढणे व विविध रंगांनी सजविण्यात मुले मग्न झाली होती. जिल्ह्यातून विरार पश्चिम उत्कर्ष विद्यालयात सर्वाधिक मुलांनी उपस्थिती दर्शवली.
विरार, सफाळे, केळवे, पालघर, नालासोपारा, बोईसर, तारापूर, वाणगाव, बोर्डी, कासा, दापचरी, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, डहाणू, दांडी, माहीम आदी ठिकाणी १७ केंद्रांवर स्पर्धा झाल्या; तर नायगाव येथील ऋषी वाल्मिकी शाळेनेही सहभाग घेतला होता. पालघर शहरी भागात बालचित्रकला स्पर्धेला रंगत आली होती. यावेळी विविध मान्यवरांनी केंद्राला भेट देत ‘सकाळ’च्या उपक्रमाचे कौतुक केले.
सकाळपासून विविध केंद्रांत पालक व मुलांची गर्दी झाली होती. कोरोना, लसीकरण यासह जीवसृष्टीसह विविध विषयांवर चित्र मुलांनी निवडले. यावेळी मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. चित्रात विविध रंगांचा वापर करत चित्र पूर्ण केल्यावर मुलांनी चित्र हातात धरून एकच जल्लोष केला. चित्र काढण्यात मुलांमध्ये पहिला कोण, अशी स्पर्धादेखील निर्माण झाली होती.
----------------------
थंडीत मुलांचा प्रतिसाद
विविध शाळांमध्ये बालचित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. रविवार सुट्टीचा दिवस, त्यात प्रचंड थंडी असतानाही विद्यार्थी व पालकांचा प्रतिसाद चांगला लाभला असल्याचे पालघर जिल्ह्यातील विविध केंद्रांत दिसून आले.
--------------------
दिव्यांग मुलांचा कौतुकास्पद उत्साह
विक्रमगडमध्ये अंध, अपंग, दिव्यांग २५, जव्हार कर्णबधिर ३७, अंध २५ व पालघरमध्ये मूक व कर्णबधिर ५२ अशा एकूण १३९ विद्यार्थ्यांनी ‘सकाळ बालचित्रकला स्पर्धे’त सहभाग घेतला. त्यांचे लोकप्रतिनिधी, शिक्षकांनी कौतुक केले.
-------------
वसई : चित्रकला केंद्रावर झालेली विद्यार्थी, पालकांची गर्दी.