प्रवाशांच्या समस्यांकडे लक्ष देण्याची मागणी महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाचे पत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रवाशांच्या समस्यांकडे लक्ष देण्याची मागणी 
महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाचे पत्र
प्रवाशांच्या समस्यांकडे लक्ष देण्याची मागणी महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाचे पत्र

प्रवाशांच्या समस्यांकडे लक्ष देण्याची मागणी महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाचे पत्र

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : उपनगरीय रेल्वे प्रवाशांना दररोज विविध समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाकडून रेल्वे मंत्रालयाला अनेकदा पत्रे पाठवण्यात आली; परंतु या पत्रांची दखल घेतली जात नाही. रेल्वे प्रवासी आणि रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये समन्वय दिसून येत नाही. त्यामुळे रेल्वेमंत्र्यांनी राज्यातील रेल्वे प्रवाशांच्या समस्यांकडे लक्ष द्यावे; अन्यथा प्रवाशांच्या रोषाला रेल्वेला सामोरे जावे लागेल, असा इशारा महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाकडून देण्यात आला आहे.

उपनगरीय लोकल सेवांमधून दररोज ७० लाखांपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात; परंतु त्यांच्या सुरक्षेची काळजी रेल्वेकडून घेतली जाताना दिसून येत नाही. आजपण धावत्या लोकलमध्ये चोऱ्या, पाकीटमारीसारखे प्रकार घडत आहेत. दिवसेंदिवस गाडीतून पडून अपघात होण्याची संख्या वाढत आहे. सकाळी गर्दीच्या वेळेस मालगाड्या आणि मेल एक्स्प्रेसला प्राधान्य दिले जात असल्याने लोकल सेवांच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम होत आहेत. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड गर्दीचा सामना करावा लागत आहे. बदलापूर, टिटवाळा, अंबरनाथ, ठाणे, दादर, घाटकोपरच्या प्रवाशांना तर कोणी वालीच नाही, अशी सध्याची परिस्थिती आहे. महिलांची, अपंग तसेच विद्यार्थी यांच्यासाठी सुरक्षा यंत्रणा प्रभावीपणे काम करीत नाहीत. यासंदर्भात महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाकडून रेल्वे मंत्रालयाला अनेक पत्रे पाठवली आहेत; परंतु अद्याप या पत्रांची दखल घेतली जात नाही. त्यामुळे रेल्वेने प्रवाशांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघ अध्यक्ष अभिजीत धुरत यांनी केली आहे.