भूखंडांवर अतिक्रमणांचा सपाटा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भूखंडांवर अतिक्रमणांचा सपाटा
भूखंडांवर अतिक्रमणांचा सपाटा

भूखंडांवर अतिक्रमणांचा सपाटा

sakal_logo
By

वाशी, ता. २३ (बातमीदार) ः एमआयडीसी क्षेत्रातील नवी मुंबई महापालिकेच्या ऐरोली नोडमधील यादवनगर व गवते वाडीतील मोकळ्या भूखंडावर अतिक्रमणाचा भूमाफियांनी सपाटा लावला आहे. एमआयडीसीचे भूखंडावर बेकायदा झोपड्या बांधून त्याची गरजवंतांना विक्री केली जात आहे. त्यामुळे बेकायदा झोपड्यांच्या विक्रीतून होणारी फसवणूक थांबवण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
एमआयडीसीतील गवतेवाडी, यादव नगर, चिंचपाडा परिसर या ठिकाणी अनेक वर्षांपासून स्थानिक झोपडपट्टी दादांनी झोपड्या थाटल्या आहेत. या झोपड्यांवर एमआयडीसीने अनेकदा कारवाईदेखील केली आहे; तर माजी पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनीदेखील एमआयडीसीच्या जागेवरील या बेकायदा झोपड्यांविरोधात दंड थोपटत कारवाईचा सपाटा लावला होता. त्यामुळे झोपडपट्टी माफियांच्या रोषाचा मुंढे यांनादेखील सामना करावा लागला होता. अखेर आयुक्तांच्या गच्छंतीनंतर पुन्हा बेकायदा झोपड्यांमुळे एमआयडीसीतील मोक्याचे भूखंड गिळंकृत केले गेले आहेत. विशेष म्हणजे मुंढे यांच्यानंतर कोणत्याच आयुक्तांनी एमआयडीसीतील बेकायदा झोपड्यांकडे लक्ष दिले नसल्याने त्यांनी एमआयडीसीच्या भूखंडांवर पुन्हा बस्तान बसवले आहे.
----------------------------------------------
राजकीय नेत्यांचा आश्रय
कोरोनानंतर एमआयडीसीच्या जागेवर मोठ्या प्रमाणात झोपड्या वाढलेल्या असताना प्रशासनाची कारवाईदेखील थंडावली आहे. तसेच शासनाने २०१० पर्यंतची घरे अधिकृत करण्याचा निर्णय घेतल्यामुळे झोपडपट्टीदादांनीदेखील भविष्यात आणखी मुदतवाढ मिळेल या आशेने शासनाचे भूखंड गिळंकृत करण्याचा सपाटा लावला आहे. विशेष म्हणजे पालिकेकडून अशा झोपड्यांना नळजोडण्या देऊन पाणीपुरवठा केला जात आहे; तर पालिकेच्या निवडणुकीत प्रभागात झोपडपट्टीमधील मतदारांसाठी राजकीय नेतेदेखील अतिक्रमणाला पाठीशी घालत आहेत.
-------------------------------
प्रशासकीय यंत्रणांना अपयश
पालिका आणि एमआयडीसीने अनेकदा अशा अतिक्रमणांवर कारवाईदेखील केली आहे. कारवाई केल्यानंतर तातडीने भूखंडांवर तारेचे तसेच पत्र्याचे कुंपणदेखील घालण्यात आले होते; मात्र झोपडपट्टी माफियांनी कुंपणच चोरल्याने अतिक्रमण रोखण्यात प्रशासकीय यंत्रणांना अपयश आले आहे.
-------------------------------
एमआयडीसीच्या जागेवर बांधण्यात आलेल्या झोपड्यांवर कारवाई करण्यात येत आहे; तर एमआयडीसीने अनेक भूखंडांवरच्या झोपड्या हटवून भूखंडदेखील कंपन्यांना विकले आहेत. शिवाय यापुढेदेखील भूखंडांवरील अतिक्रमणांवर पोलिस बंदोबस्तात कारवाई करण्यात येईल.
- एस. पी. शिंदे, उपअभियंता, एमआयडीसी
------------------------------------
एमआयडीसीच्या भूखंडांवर अतिक्रमण केले आहे. त्याच्यावर पालिकेकडून कारवाई करण्यात येत असते. एमआयडीसी कारवाई करत असल्यास त्यांना सहकार्य करण्यात येईल.
- महेंद्र सप्रे, सहायक आयुक्त, ऐरोली विभाग