
खोदकामांमुळे शाब्दिक चकमक
वाशी, ता. २३ (बातमीदार)ः नवी मुंबईत रस्त्यांचे काँक्रीटीकरण, मलनिस्सारण वाहिन्या, महानगर गॅसची तसेच भूमिगत विद्युत वाहिन्यांची कामे सुरू आहेत. यासाठी शहरातील अनेक ठिकाणी रस्ते खोदण्यात आले आहेत, पण या खोदकामांमुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनचालकांमध्ये वादावादीचे प्रसंग उद्भवत आहेत. त्यामुळे एकाच वेळी सुरू झालेल्या विकासकामांमुळे नवी मुंबईकर हैराण झाले आहेत.
दिघा येथील विष्णुनगर परिसर, ऐरोली सेक्टर दोन त्याचबरोबर ऐरोली कटाई मार्ग तसेच सायन-पनवेल महामार्गावर बेलापूर, नेरूळ एलपी रस्त्यावर सध्या खोदकाम करण्यात आलेले आहे. ज्या ठिकाणी रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. त्या ठिकाणी रस्त्याचे काम अतिशय संथगतीने सुरू असल्यामुळे वाहनचालकांना व पादचाऱ्यांना रस्त्यांमध्ये बदल करावा लागत आहे; तर ज्या ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत, त्या ठिकाणी पुढे रस्ता बंद आहे, असा फलकही लावण्यात न आल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. तसेच एका बाजूने वाहनासाठी रस्ता खुला ठेवण्याऐवजी दोन्ही बाजूने जाणाऱ्या वाहनांसाठी रस्ता खुला ठेवण्यात येत असल्यामुळे समोरासमोर येणाऱ्या वाहनांमुळे वाहन चालकांमध्ये शाब्दिक चकमकीदेखील वाढल्या आहेत.
--------------------------------
बांधकाम साहित्यामुळे अपघातांचे सत्र
रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू असताना रस्त्याचा काम सुरू असलेला भाग हा पूर्णपणे बंद करण्यात येतो, परंतु उरलेला अर्धा रस्ता हा वाहतुकीसाठी पुढे जाऊन बंद ठेवण्यात आल्याने वाहनचालकांसह पादचाऱ्यांना परत यावे लागत आहे. तसेच ज्या ठिकाणाची रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत, त्या रस्त्यांवरील वाळू, सिमेंट तसेच पडून असल्यामुळे वाहनांच्या अपघातांचे प्रमाण वाढल्यामुळे विकासकामांनी नवी मुंबईकर बेजार आहेत.
---------------------------
खड्ड्यांमुळे पादचारी हैराण
भूमिगत विद्युत वाहिन्या टाकलेल्या असल्यामुळे अनेकदा विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार होतात. त्यामुळे ज्या ठिकाणी बिघाड झाला आहे तो शोधण्यासाठी पुन्हा रस्ता खोदण्यात येतो; मात्र खोदकामानंतर रस्ते पुन्हा पूर्ववत केले जात नसल्याने रस्त्यांना खड्डे पडल्याचे दिसत असल्यामुळे पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
़़़़ः---------------------------------
ज्या ठिकाणी विकासकामे सुरू आहेत, त्या ठिकाणी ठकेदारांकडून दुर्लक्ष होत असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. तसेच संबंधित विभागाच्या अभियंत्यांना पाहणी करण्यास सांगण्यात येईल.
- संजय देसाई, शहर अभियंता, नमुंमपा