अवघ्या काही तासांत चोरीचा छडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवघ्या काही तासांत चोरीचा छडा
अवघ्या काही तासांत चोरीचा छडा

अवघ्या काही तासांत चोरीचा छडा

sakal_logo
By

प्रमोद जाधव
अलिबाग, ता. २३ ः अलिबाग तालुक्यातील चौल-भोवाळे येथील दत्त मंदिरात डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात चोरी झाली होती. त्यानंतर महिनाभरात अलिबाग-पेण मार्गावरील पात्रुदेवी मंदिरात चोरी झाली होती. मंदिर चोरीप्रकरणामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. मात्र वेगवेगळ्या माध्यमातून पोलिसांनी शोध घेत पात्रुदेवी मंदिरातील चोरट्यांचा छडा लावला. या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला मुद्देमालासह ताब्यात घेण्यास यश आले आहे.

रायगड जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरत असताना, धार्मिक स्थळाच्या दृष्‍टिनेही जिल्ह्याची वेगळी ओळख आहे. जिल्ह्यात वेगवेगळे ऐतिहासिक मंदिरे आहेत. अलिबाग-पेण मार्गावर कार्लेखिंड या ठिकाणी रस्त्याच्या बाजूलाच पात्रुदेवीचे जागृत देवस्थान आहे. अनेक प्रवासी या मंदिराजवळ थांबून दर्शन घेतल्याशिवाय पुढचा प्रवास करीत नाही. १२ जानेवारी पहाटे पुजारी मंदिर उघडण्यासाठी आले असता मंदिरातील घंटा, मूर्ती, इन्व्हर्टर आदी वस्तू चोरीला गेल्‍याचे आढळले. घटनेची माहिती मिळताच अलिबाग पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली.
मंदिरातील वस्तूंसह सुमारे ७ हजार ८०० रुपयांचा ऐवज लंपास झाला होता. लंपास झालेला ऐवज कमी असला, तरी या जागृत देवस्थानातील चोरी होणे ही मोठी घटना होती. संवेदनशील विषय असल्याने पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी घटनेच्या तपासाची सूत्रे वेगात हलवण्याच्या सूचना दिल्या. जिल्ह्यातील सर्वच यंत्रणा कामाला लागली.
अलिबाग पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक ओमप्रकाश कावळे यांच्याकडे गुन्ह्याचा तपास देण्यात आला. राज्यातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांशी ईमेल, सोशल मिडीयामार्फत संपर्क साधून मंदिर चोरीतील गुन्ह्यांमधील आरोपींची माहिती घेण्यात आली. सायबरसह वेगवेगळ्या पोलिस यंत्रणेची मदत घेण्यात आली. अखेर पोलिसांना चोरट्यांचा सुगावा लागला.

जळगावातून आरोपी ताब्‍यात
पोलिस निरीक्षक शैलेश सणस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक ओमप्रकाश कावळे, हवालदार सुनील फड, अनिकेत म्हात्रे यांचे एक पथक खात्रीशीर माहितीनुसार जळगावमध्ये पाठविण्यात आले. जळगाव पोलिसांच्या मदतीने चोरट्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून मुद्देमालही जप्त करण्यात आला. रविवारी पहाटे चोरट्याला पोलिसांनी मुद्देमालासह अलिबागमध्ये आणले. त्याला अलिबाग येथील न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

रेखी करून मंदिरात चोरी
पात्रुदेवी मंदिर परिसरात रात्री फारशी वर्दळ नसते. याची माहिती चोरटा दिलीप यादव घोडके याने घेतली होती. चोरी करण्याच्या एक दिवस आधी तो इनोव्हा कारमधून दोन साथीदारांसमवेत अलिबागमध्ये आला. दर्शनाच्या बहाण्याने मंदिरात गेला. तेथील आजूबाजूच्या परिसरातील माहिती घेतली. रात्री आठ नंतर मंदिरात येणाऱ्यांची वर्दळ कमी होते, हे त्याच्या लक्षात आले. मंदिरात रेखी करून झाल्यावर पहाटे दोन ते अडीचच्या सुमारास कोणीही नसल्याचा अंदाज घेत साथीदारांच्या मदतीने मंदिरातील ग्रीलचे कुलूप तोडले. दानपेटी फोडून रोख रक्कम, समई, मूर्ती व इन्व्हर्टर असा एकूण ७ हजार ८०० रुपयांचा ऐवज लंपास केला. त्याच्याविरोधात अहमदनगर, जळगाव, कल्याण, अलिबाग अशा अनेक पोलिस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.