
ठाणेकरांच्या सेवेत इलेक्ट्रिक बस
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २३ : ठाणे शहराचे झपाट्याने होणारे नागरीकीकरण, त्यात वाहनांची वाढती संख्या यांमुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ठाणे परिवहन विभागाने इलेक्ट्रिक बस घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार ठाणे परिवहन सेवेत नवीन इलेक्ट्रिक बस येत्या २६ जानेवारीपासून ठाणेकरांच्या सेवेत दाखल होणार आहेत. फेब्रुवारी अखेरपर्यंत एकूण १२३ बस ठाणेकरांच्या सेवेत दाखल होणार असून, आचार संहिता संपताच सीएनजी २० बस देखील दोन टप्प्यात दाखल होणार आहेत.
ठाणे शहरातील झपाट्याने होणारा विस्तार त्याचबरोबर नागरिकीकरण यांमुळे शहराच्या लोकसंख्येत देखील वाढ होत आहे. ठाणेकरांचा प्रवास सुखकर आणि पर्यावरणस्नेही व्हावा, यासाठी महापालिका प्रशासनाने प्रदूषणविरहित अशा विजेवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक बस घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. केंद्र सरकारने १५ व्या वित्त आयोगाच्या तरतुदीनुसार पर्यावरणाचा समतोल राखला जावा, याकरिता महापालिका आणि नगरपालिका यांना विविध उपाययोजना करण्यासाठी निधी देण्यात येत असतो. त्यानुसार ठाणे महापालिकेस १२३ इलेक्ट्रिक घेण्यासाठी ५८ कोटी १० लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यानुसार टप्प्याटप्प्याने या बस ठाणेकरांच्या सेवेत दाखल करण्याचा परिवहनचा मानस आहे. त्यानुसार जानेवारी महिन्याच्या अखेरीस ३२ बस परिवहनच्या सेवेत दाखल होणार आहेत. सध्या ठाणे महापालिका क्षेत्रात विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. परिणामी, याचा फटका इलेक्ट्रिक बसच्या उदघाटनाला बसण्याची शक्यता होती. पण नागरिकांना अधिकची बस सेवा उपलब्ध व्हावी. या उद्देशाने परिवहनने यातून मार्ग काढला आहे. त्यानुसार आचारसंहिता संपण्याची प्रतीक्षा न करता, जस जशा या बस परिवहनला प्राप्त होतील तशा त्या ठाणेकरांच्या सेवेत दाखल करण्याचा ठाणे परिवहनचा मानस आहे.
.................................
इलेक्ट्रिक बस पाठोपाठ सीएनजीच्या देखील २० बस परिवहनच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. त्या ट्रेलरमधून ठाण्यात आणल्या जाणार आहेत. त्यानुसार पहिल्या टप्प्यात १० आणि दुसऱ्या टप्प्यात १० अशा एकूण २० बस दाखल होणार आहेत. त्यानुसार या बसची सेवा ९ फेब्रुवारी अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी करण्याचा मानस परिवहनचा आहे.
...........................
कोट :-
२६ जानेवारी रोजी परेडच्या दिवशी दोन बस रस्त्यावर धावणार आहे. टप्प्याटप्याने या महिना अखेरीस ३२ बस सेवेत दाखल होतील. तर फेब्रुवारी अखेरपर्यंत सर्वच बस परिवहनच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. वर्षभरात किमान २०० इलेक्ट्रिक बस घेण्याचा परिवहनचा मानस आहे.
- विलास जोशी, सभापती, ठाणे परिवहन.