
१९८४ च्या लढ्यातील आंदोलनकर्त्यांचे अटक वॉरंट रद्द
तुर्भे, ता. २३ (बातमीदार) : १९८४ मध्ये भूमिपुत्रांच्या लढ्यातील आंदोलनकर्त्यांना तब्बल ३८ वर्षांनंतर पोलिसांनी अटक वॉरंट बजावले होते. याप्रकरणी बेलापूर न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते; मात्र न्यायालयीन सुनावणीवेळी सोमवारी (ता. २३) हे अटक वॉरंट रद्द करण्यात आले.
१९८४ मध्ये सिडको प्रकल्पग्रस्तांना १२.५ टक्के भूखंड मिळावा, यासाठी भूमिपूत्रांनी आंदोलन केले होते. याप्रकरणी सानपाडा पोलिस ठाण्यातून ४२ आंदोलनकर्त्यांना शनिवारी (ता. २१) अटक वॉरंट बजावण्यात आले होते. त्यानुसार १९८४ च्या लढ्यातील आंदोलनकर्ते प्रकाश पाटील आणि विनोद भगवान म्हात्रे, मयत हरिश्चंद्र कृष्णा म्हात्रे यांचे बंधू अजय म्हात्रे आणि हर्षला म्हात्रे पाटील हे बेलापूर न्यायालयात हजर झाले होते. या वेळी ॲड. समित पाटील यांनी न्यायालयात आंदोलनकर्त्यांची बाजू मांडली. त्यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत अटक वॉरंट रद्द करण्याची न्यायालयाला विनंती केली. न्यायालयाने ४२ आंदोलकांविरोधातील अटक वॉरंट रद्द केले आणि १३ फेब्रुवारीला पुढील सुनावणी होणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. आगरी कोळी यूथ फाऊंडेशनचे अध्यक्ष नीलेश पाटील, सॅन्डी पाटील, ॲड. समीर पाटील, एच. बी. पाटील, अमित पाटील, सुनील पाटील यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.