
विद्या विहार शाळेत कला प्रदर्शन
विरार, ता. २४ (बातमीदार) : विरार येथील विद्या विहार शाळेत कला प्रदर्शन व हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेत हळदी-कुंकूसाठी ३०० पेक्षा जास्त महिलांनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विद्या विकासिनी कला दृक् महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रवीण शिंदे व स्थानिक नगरसेवक हार्दिक राऊत उपस्थित होते. या वेळी विद्यार्थ्यांनी पारंपरिक आदिवासी वेशभूषा धारण करून पाहुण्यांचे व उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. विविध कला साहित्यांचा वापर करून म्युरल आर्ट, क्राफ्ट पेंटिंग, बॉटल पेंटिंग, ग्लास पेंटिंग अशा प्रकारच्या कलाकृती विद्यार्थ्यांनी सादर केल्या होत्या. संस्थेच्या संस्थापिका, मुख्याध्यापिका डॉ. मंगला परब यांनी विध्यार्थ्यांनी साकारलेल्या या कलाकृती म्हणजे मनातील भावना व्यक्त करण्याचे साधन आहे, अशा शब्दांत विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे कौतुक केले. सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे कला शिक्षक जयेश गायकवाड, तेजस्वी सरक यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाचे व्यवस्थापन ज्येष्ठ शिक्षक रामकृष्ण मेहता, सहशिक्षक दक्षता परब यांनी केले.