
राष्ट्रीय नवोपक्रम स्पर्धेत शरद कांबळे यांचे यश
खर्डी, ता. २४ (बातमीदार) : शहापूर तालुक्यातील कसारा येथील आनंदनगर या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक शरद कांबळे यांचा दै. सकाळमधील ‘बालमित्र’वरचा नवोपक्रम विजेता ठरला आहे. शैक्षणिक संशोधन व नवोपक्रम या क्षेत्रात कार्य करणाऱ्या पुणे येथील सर फाऊंडेशन या प्रख्यात संस्थेने राष्ट्रीय स्तरावरील नवोपक्रम स्पर्धा आयोजित केली होती. यामध्ये शिक्षक कांबळे यांना प्रकल्प सादर केला होता. त्यांच्या ह्या उपक्रमाला यश मिळाल्याने त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील, माजी आमदार पांडुरंग बरोरा, कसाऱ्याचे सरपंच प्रकाश वीर, उपसरपंच शरद वेखंडे, गटशिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. दैनिक सकाळमधील दर शनिवारी प्रकाशित होणाऱ्या ‘बालमित्र’ या पुरवण्यांचा अध्यापनात बहुउद्देशीय वापर हा नवोपक्रम म्हणून शरद कांबळे यांनी सादर केला होता. यात गेल्या पाच वर्षांपासूनच्या दर शनिवारच्या सकाळमधील बालमित्र या पुरवण्यांचे संकलन करून पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांकरीता वाचन, लेखन, अभिव्यक्ती, मनोरंजन अशा विविध उद्देशाने वापर करण्याबाबत नवोपक्रम घेण्यात आला होता.