चुनाभट्टीत सुक्या कचऱ्याला आग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चुनाभट्टीत सुक्या कचऱ्याला आग
चुनाभट्टीत सुक्या कचऱ्याला आग

चुनाभट्टीत सुक्या कचऱ्याला आग

sakal_logo
By

चेंबूर, ता. २५ (बातमीदार) ः जॉगिंग इंडस्ट्रियल बिल्डिंग नं. ५ समोरील मोकळ्या जागेतील सुक्या कचऱ्याला मंगळवारी (ता. २४) अचानक मोठी आग लागली होती. या आगीची माहिती मिळताच स्थानिकांनी अग्निशमन दल व चुनाभट्टी पोलिसांना माहिती दिली. त्‍यांनी घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली.

चेंबूर हायस्‍कूलमध्‍ये रस्ता सुरक्षा अभियान
चेंबूर, ता. २५ (बातमीदार) ः शालेय जीवनात विद्यार्थ्यांना वाहतुकीच्‍या नियमांची माहिती मिळावी यासाठी वाहतूक विभाग मुंबईअंतर्गत रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात आले. आरएसपी शिक्षक भारती संघटना व मुंबई वाहतूक शिक्षण विभागाच्या वतीने चेंबूर हायस्कूलमध्ये याविषयी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रस्ता सुरक्षेबाबत विद्यार्थ्यांना चुनाभट्टीचे पोलिस निरीक्षक दीपक बागुल यांनी मार्गदर्शन केले. या वेळी पोलिस निरीक्षक सुरेश पवार, पोलिस नाईक सुरेश पवार उपस्थित होते. या कार्यक्रमाला मुंबई उपनगरातील इयत्ता सहावी व नववीमधील विद्यार्थी मोठ्या संख्‍येने सहभागी झाले होते. या कार्यक्रमासाठी चेंबूर हायस्कूलच्‍या मुख्याध्यापिका प्रभात चव्हाण, उपमुख्याध्यापक सुभाष माने, युवक सभा निमंत्रक जयश्री सूर्यवंशी, आरएसपी उत्तर विभागाचे अध्यक्ष वसंत उंबरे, आरएसपी शिक्षक अधिकारी मच्छिंद्र खरात उपस्थित होते.

श्री ज्ञानेश्वर विद्या मंदिरच्या चार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
कांदिवली, ता. २५ (बातमीदार) ः पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (इयत्ता पाचवी) परीक्षेत कांदिवली पश्चिम येथील श्री ज्ञानेश्वर विद्या मंदिर शाळेतील रोशन शिंदे, हर्षल भोसले, देवांग सांबर आणि आर्यन कदम या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळवून घवघवीत यश मिळवले आहे. या विद्यार्थ्यांना शाळेच्या शिक्षिका संध्या पवार, रेखा भामरे, उल्का वर्तक तसेच हरिदास बाबर यांनी मार्गदर्शन केले. सरस्वती एज्युकेशन सोसायटीचे सचिव वसंतदादा भोसले आणि सर्व विश्वस्त यांनी या यशस्वी विद्यार्थी आणि शिक्षकांचे अभिनंदन केले.

सह्याद्री नगरमध्‍ये महाआरोग्य शिबिर
कांदिवली, ता. २५ (बातमीदार) ः हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्‍या जयंतीनिमित्त शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचित शाखाप्रमुख अरविंद साळुंखे यांनी ऑस्कर हॉस्पिटल आणि शिवतेज आरोग्य संस्थेच्या वतीने मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. शिबिराचे उद्घाटन सह्याद्री हौसिंग सोसायटीचे अध्यक्ष विनायक साळुंखे व डॉ. नितीन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिराचा ९५० नागरिकांनी लाभ घेतला. कांदिवली पश्चिम येथील सह्याद्री नगर मैत्री कट्टा, चारकोप येथील मैदानात हे शिबिर पार पडले. ऑस्कर हॉस्पिटलचे संचालक डॉ. नितीन पवार व त्यांची टीम तसेच डोळ्याचे सुप्रसिद्ध साहू हॉस्पिटल यांच्या अंतर्गत संपूर्ण शिबिरात तपासणी करण्यात आली. या शिबिरात नेत्रतपासणी, मोफत चष्मावाटप, स्त्रियांचे आजार, कर्करोग तपासणी, बालरोग चिकित्सा, दंतचिकित्सा, रक्तदाब तपासणी, मधुमेह, कान, नाक, घसा तपासणी, औषधोपचार, ई.सी.जी. तपासणी आदी तपासण्या करण्यात आल्या.

पथनाट्य स्पर्धेत सोडावाला लेन इंग्रजी शाळा प्रथम
कांदिवली, ता. २५ (बातमीदार) ः मुंबई महापालिका शिक्षण विभाग आयोजित हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे पथनाट्य महाअंतिम स्पर्धेमध्ये सोडावाला लेन इंग्रजी महापालिका शाळेने प्रथम पारितोषिक पटकावले. सतत चौथ्या वर्षी विजेता पारितोषिक पटकावल्याने सर्व कलाकार विद्यार्थ्यांसह शिक्षिका तृप्ती संखे यांच्यावर शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक आणि पालकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पश्चिम उपनगरातील आर/मध्य विभागातील सोडावाला लेन इंग्रजी शाळेने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे पथनाट्य महाअंतिम स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक पटकावून महापालिका शिक्षण विभागात बहुमान प्राप्त केला आहे. उत्कृष्ट लेखनासाठी तृप्ती संखे यांनाही प्रथम पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. मुख्याध्यापिका सूचना संखे यांनी विशेष कौतुक केले. शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, उपशिक्षणाधिकारी संगीता तेरे, अधीक्षक मुख्तार शाह, दीपिका पाटील, निसार खान, प्रशासकीय अधिकारी शाळा शोभा वडियार व विभाग निरीक्षिका सुनंदा मिरजकर यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले.

समाजकल्‍याण केंद्राचे लोकार्पण
मानखुर्द, ता. २५ (बातमीदार) ः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मानखुर्दच्या शिवनेरी नगर येथे सोमवारी (ता. २३) एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या प्रवक्त्या व विधान परिषद सदस्य डॉ. मनीषा कायंदे यांच्या हस्ते समाजकल्याण केंद्राचे लोकार्पण करण्यात आले. कायंदे यांच्या आमदार निधीतून बांधण्यात आलेल्या केंद्रासाठी स्थानिक माजी नगरसेविका समीक्षा सक्रे यांनी पाठपुरावा केला होता. ईशान्य मुंबईचे विभागप्रमुख सुरेश पाटील, तसेच विभाग संघटक प्रज्ञा सकपाळ या वेळी उपस्थित होते. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक या आयोजनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.