पाईपलाईनच्या कामाने रस्ते उखडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाईपलाईनच्या कामाने रस्ते उखडले
पाईपलाईनच्या कामाने रस्ते उखडले

पाईपलाईनच्या कामाने रस्ते उखडले

sakal_logo
By

मोखाडा, ता. २४ (बातमीदार) : मोखाड्यातील पाणीटंचाईचे दुर्भिक्ष दूर करण्यासाठी जलजीवन मिशन योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम महिनाभरापासून सुरू झाले आहे. ईगल इन्फ्रा इंडिया या कंत्राटदाराने हे काम नियमबाह्य करून तालुक्यातील मुख्य रस्त्यांसह, गाव-पाड्यांना जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था केली आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही, त्याकडे प्रशासनाने डोळेझाक केली आहे. अखेर पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम व सर्वपक्षीय पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली आहे.

केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त निधीतून पाणीटंचाईग्रस्त भागात जलजीवन मिशन योजनेंतर्गत नळपाणीपुरवठा योजना अंमलात आणली आहे. या योजनेचे काम मोखाडा तालुक्यातही महिनाभरापासून सुरू करण्यात आले आहे. हे काम उल्हासनगर येथील ईगल इन्फ्रा इंडिया ही कंत्राटदार कंपनी करत आहे. त्यासाठी २०१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नळपाणीपुरवठा योजनेचे काम करताना जिल्हा परिषद बांधकाम, सार्वजनिक बांधकाम आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अखत्यारीतील रस्त्यालगत खोदकाम करण्याची परवानगी न घेता, पाईपलाईन टाकण्याचे काम केले आहे; तर काही भागात रस्त्यालगत वरवर खोदाई करून नळपाणीपुरवठा योजनेचे पाईप टाकले आहे. डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर जेसीबी चालवण्याची परवानगी नसताना, तो चालवला जात असल्याने सर्व ठिकाणचे रस्ते उखडले आहेत.

-------------
समज देऊनही पुन्हा काम सुरू
जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी आणि नागरीकांनी अनेकदा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी, बांधकाम विभाग तसेच तहसीलदारांकडे तक्रार केली आहे. अधिकाऱ्यांनी संबंधित कंत्राटदारास समज दिली आहे. काही अधिकाऱ्यांनी नियमबाह्य कामही बंद केले; मात्र संबंधित कंत्राटदार पुन्हा काम सुरू करून नियमबाह्य खोदाई करत रस्त्यांची दुरवस्था करत आहे. त्यामुळे या कंत्राटदारास कोणाचा वरदहस्त आहे, या विषयी तालुक्यात चर्चा सुरू झाली आहे.

--------------
संयुक्त बैठक बोलवणार
पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण मोखाडा दौऱ्यावर आले असता त्यांची भेट घेऊन या कंत्राटदाराची तक्रार केली आहे. स्थानिक नागरिकांच्या तक्रारीवरून तहसीलदार मयुर खेंगले यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अभियंता व तक्रारदार यांची संयुक्त बैठक बोलावली असल्याचे सांगितले आहे.