
दुचाकीवरून तोल गेल्याने सराईत चोरटा ताब्यात
ठाणे, ता. २४ (वार्ताहर) : मोटरसायकलवरून धूम स्टाईलने येत पादचाऱ्यांच्या हातातील मोबाईल खेचून पळणाऱ्या चार चोरट्यांना राबोडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून विविध गुन्ह्यांतील दोन लाख ३२ हजारांचे २० मोबाईल आणि एक लाख ३५ हजारांच्या तीन दुचाकी असा तीन लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सुनीलकुमार रामनाथ गौड (वय ३५, रा. गोकुळदास वाडी, भाजीवाडा, ठाणे) हे घरी पायी चालत जात असताना मोटरसायकलवरून जाणाऱ्या तीन अज्ञात इसमांपैकी एकाने त्यांच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने खेचून दुचाकीवरून पळाले होते; मात्र काही अंतरावर जाऊन मोटरसायकलचा तोल गेल्याने मागे बसलेला पवन नरसिंग गौड (वय २२) हा खाली पडला. नागरिकांनी तात्काळ धाव घेत त्याला पकडून राबोडी पोलिसांच्या स्वाधीन केले होते. या घटनेतील अन्य आरोपी पसार होते. राबोडी पोलिसांनी पवन याच्याकडे सखोल चौकशी केली अन्य सहकाऱ्यांची माहिती दिली. अधिक चौकशीनंतर पोलिसांनी विकास प्यारेलाल राजभर (वय २२, रा. साठेनगर, भिवंडी), संजय ब्रिजमोहन राजभर (वय २०, रा. कारवली, भिवंडी), किशमोहन संगम गौड (वय २२, रा. कामतघर, मूळ रा. जिल्हा गोरखपूर, उत्तर प्रदेश) यांना अटक केली. पवन नरसिंग गौड याच्यासह चौघांनी गुन्हा केल्याची कबुली दिली.