
समर्थ भारताचे चित्रांमधून प्रतिबिंब
नवी मुंबई ः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘परीक्षेपे चर्चा’ या कार्यक्रमांतर्गत २०१८ पासून देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधून परीक्षांपूर्वी तणाव दूर करण्याचे मार्ग सांगतात. या उपक्रमाअंतर्गत ऐरोली विधानसभा क्षेत्रातील कोपरखैरणे येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मंडळाने घेतलेल्या चित्रकला स्पर्धेत दहा हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
ऐरोली विधानसभा क्षेत्रातील विविध शाळांमध्ये ही स्पर्धा पार पडली. यावेळी कोपरखैरणे येथील रा. फ. नाईक विद्यालयामध्ये माजी खासदार डॉ. संजीव नाईक, ऐरोली विधानसभा क्षेत्राचे प्रथम आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक यांनी उपस्थिती दर्शवत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना जी ट्वेंटी जागतिक विश्वगुरू बनण्याच्या दृष्टीने भारताची वाटचाल, आजादी का अमृत महोत्सव, सर्जिकल स्ट्राइक, कोरोना लसीकरणमध्ये भारत नंबर १ असे दहा विषय देण्यात आले होते. या विषयांवर विद्यार्थ्यांनी कल्पकतेने चित्रे रेखाटत सशक्त आणि समर्थ भारताची छबी प्रतिबिंबित केली होती.
़़़़़ः------------------------------------
वाशीत आज बक्षीस वितरण
स्पर्धेतील प्रथम तीन, उत्कृष्ट दहा आणि २५ विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येणार आहेत. चित्रकला स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला सहभागाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. या स्पर्धेचा वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये बक्षीस वितरण समारंभ आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते होणार आहे.