
अत्याचारप्रकरणी जन्मदात्या बापाला वीस वर्षांची जन्मठेप
पालघर, ता. २४ (बातमीदार) : अल्पवयीन मुलीवर जन्मदाता बापानेच अनेक वेळा लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पालघर सत्र न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले. त्याला २० वर्षे जन्मठेप आणि तीन हजारांचा दंड ठोठावला.
पेनंद, सफाळे येथे सीताराम गोपजी पागी (वय ५०) हा पत्नी आणि दोन मुलांसह राहत होता. तो कोणताही कामधंदा करीत नसल्याने आणि दारू पीत असल्याने त्याची पत्नी झाडाची पाने तोडून दादर मार्केटमध्ये त्याची विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होती. मुलीची आई सफाळे रेल्वे स्थानकातून पहाटेची रेल्वे पकडून मुंबईला गेल्यावर बाप मुलीवर लैंगिक अत्याचार करीत होता. जन्मदात्या बापाचे सततचे अत्याचार सहन न झाल्याने तिने धीर करून आईला सर्व हकिगत सांगितली. तिने सफाळे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांची भेट घेत तक्रार दिली होती. पोलिस अधिकाऱ्यांनी आरोपीच्या घरी जात त्याच्या मुसक्या आवळत अटक केली होती. आरोपीविरोधात पोक्सो, बलात्कार आदी विविध कलमान्वये १८ फेब्रुवारी २०१८ रोजी गुन्हा दाखल केला होता.
पालघर सत्र न्यायालयातील न्यायाधीश एम. एस. देशपांडे यांच्यासमोर सुनावणी झाल्यानंतर सरकारी वकील ॲड. एस. बी. सावंत यांनी प्रखरपणे बाजू मांडली. या प्रकरणी दोषी आढळल्यानंतर जन्मदात्या बापाला शिक्षा सुनावण्यात आली.