पद्मश्री दया पवार प्रतिष्ठानच्या ‘चावडी’वर रंगणार आणीबाणीची चर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पद्मश्री दया पवार प्रतिष्ठानच्या ‘चावडी’वर रंगणार आणीबाणीची चर्चा
पद्मश्री दया पवार प्रतिष्ठानच्या ‘चावडी’वर रंगणार आणीबाणीची चर्चा

पद्मश्री दया पवार प्रतिष्ठानच्या ‘चावडी’वर रंगणार आणीबाणीची चर्चा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २५ : पद्मश्री दया पवार प्रतिष्ठानच्या वतीने ‘चावडी’ हा एक नवा सार्वजनिक मंच सुरू करण्यात येणार आहे. चावडीच्या पहिल्याच कार्यक्रमात भारतीय लोकशाहीच्या अस्तित्वाबाबत म्हणजेच ‘अघोषित आणीबाणी’बाबत विचारवंतांची व्याख्याने होणार आहेत, अशी माहिती प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा तथा ज्येष्ठ कवयित्री व लेखिका प्रा. डॉ. प्रज्ञा दया पवार यांनी दिली.
पद्मश्री दया पवार प्रतिष्ठान आयोजित ‘चावडी’चे उद्‌घाटन शनिवारी (ता. २८) सायंकाळी ५ ते ९ या वेळेत दादर माटुंगा कल्चरल सेंटर, जे. के. सावंत मार्ग, माटुंगा पश्चिम येथे लोकशाहीर कडुबाई खरात यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. चावडीमध्ये दोन व्याख्याने, कवी-संमेलन तसेच शाहिरी गायन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ पत्रकार व लेखक प्रा. सुरेश द्वादशीवार आणि युवा अभ्यासक, लेखक डॉ. सूरज एंगडे यांची अनुक्रमे ‘अघोषित आणीबाणीच्या विळख्यात भारतीय लोकशाही’ आणि ‘समतावादी समाजाचा युटोपिया’ या विषयांवर व्याख्याने होणार आहेत. ज्येष्ठ कवी, लेखक अर्जुन डांगळे यांच्या अध्यक्ष असलेल्या ‘पाणी कुठंवर आलं गं बाई’ हा दया पवारांच्या कवितांचा तसेच निमंत्रित कवींच्या कवितांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर, नीरजा, अविनाश गायकवाड, गणेश कनाटे, छाया कोरेगावकर, दिशा पिंकी शेख, अक्षय शिंपी हे कवी-कवयित्री सहभागी होतील. लोकशाहीच्या समर्थकांसह समतावादी विचारधारेच्या नागरिकांनी या वैचारिक सांस्कृतिक जागरात सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. प्रज्ञा दया पवार यांनी केले आहे.