
रोटरी क्लब ॲाफ न्यु कल्याणतर्फे हाफ मॅरेथॅान
कल्याण, ता. २५ (बातमीदार) : दरवर्षीप्रमाणे यंदाही रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याणतर्फे २९ जानेवारीला हाफ मॅरेथॅान आयोजित करण्यात आलेली आहे. या वर्षी यामध्ये तब्बल २१०० पेक्षाही अधिक लोकांनी सहभाग घेतला आहे. यामध्ये दिव्यांग, अंशतः अंध, तृतीय पंथींचा समावेश आहे.
रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याणतर्फे समाजातील दिव्यांगांच्या मदतीसाठी रोटरी दिव्यांग केंद्र चालवण्यात येते. या केंद्रामध्ये दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हात व पाय पूर्णपणे मोफत देण्यात येतात. आतापर्यंत हजारो दिव्यांग गरजूंना क्लबतर्फे महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी आणि चंडीगड येथे कृत्रिम हात व पाय पूर्णपणे मोफत देण्यात आलेले आहेत. याच्या आणि रोटरीच्या इतर समाजोपयोगी प्रकल्पाच्या मदतीसाठी रोटरी मॅरॅथॉनसारखे अनेक कार्यक्रम करत असतात, असे क्लब प्रेसिडेंट डॉक्टर सुश्रुत वैद्य यांनी सांगितले.
नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मॅरेथॅानला हजेरी लावावी आणि सहभागी धावपटूंचा उत्साह वाढवावा. तसेच रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याणच्या दिव्यांग सेंटरला जरूर भेट द्यावी, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याणचे पदाधिकारी ॲड. निखिल बुधकर यांनी केले आहे.