
बेकायदा गर्भपाताविरोधात महापालिकेची मोहीम
बेकायदा गर्भपातावर महापालिकेची नजर
पनवेलमधील रुग्णालयांसाठी नियमावली; कडक कारवाईचा इशारा
पनवेल, ता. २५ (बातमीदार) : महापालिका हद्दीत बेकायदा गर्भपात करणाऱ्या रुग्णालयांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. या अनुषंगाने पालिकेने निमयावली जाहीर केली असून महापालिका कार्यक्षेत्रात बेकायदा गर्भलिंग चाचणी होत असल्यास त्याची त्वरित माहिती देण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रातील रुग्णालये तसेच सोनोग्राफी सेंटर्सबद्दलच्या शासकीय नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याबाबत गर्भलिंग प्रतिबंध कायदा समितीची नुकतीच एक बैठक मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. या बैठकीत एखाद्या सोनोग्राफी सेंटरची मुदत संपत आल्यास एक महिना आधीच सर्व कागदपत्रांची पूर्तता करून, त्या सोनोग्राफी सेंटरने पुढील मान्यतेसाठी महापालिकेकडे अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच विनापरवानगी सुरू असलेल्या सोनोग्राफी सेंटरवर कडक कारवाई करण्याचा इशारा पालिकेने दिला आहे. तसेच महापालिका क्षेत्रातील कोणत्याही रुग्णालयात ०-५ वयोगटातील बालकाचा मृत्यू झाल्यास चोवीस तासांच्या आत महापालिकेला त्याची माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
--------------------------
गर्भलिंग चाचणीविषयक महापालिकेने नियमावली तयार केली आहे. महापालिका क्षेत्रातील सर्व रुग्णालयांसाठी ही नियमावली बंधनकारक असून त्यांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.
- डॉ. आनंद गोसावी, मुख्य वैद्यकीय अधिकारी, पनवेल महापालिका