बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात योजनेची प्रतीक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात योजनेची प्रतीक्षा
बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात योजनेची प्रतीक्षा

बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात योजनेची प्रतीक्षा

sakal_logo
By

कर्जत, ता. २५ (बातमीदार) : कोविड काळात मंत्रिमंडळ बैठकीमध्ये बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेस सार्वजनिक आरोग्य विभागाकडून मान्यता मिळाली होती. या योजनेंतर्गत रस्ते अपघातानंतर आपत्कालीन ७२ तासांच्या आत मोफत वैद्यकीय सेवा दिली जाईल, अशी तरतूद आहे. मात्र, ही योजना अद्याप अमलात आणली नसल्याने रुग्णांना त्‍याचा कोणताही लाभ मिळत नाही. या योजनेची अंमलबजावणी झाल्यास त्याचा अनेकांना लाभ होईल, असे प्रतिपादन सारथी सुरक्षा सेवा संस्थेचे विनय मोरे यांनी केले.
कोकण ज्ञानपीठ राहुल धारकर महाविद्यालयात समर्थ ड्रायव्हिंग स्कूलच्या सहकार्याने रस्ते सुरक्षा अभियाननिमित्ताने महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये विशेष समारंभ झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. या समारंभाचे उद्‍घाटन मोटर वाहन निरीक्षक नीलेश धोटे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी धोटे यांनी, वाहन चालवताना छोट्याशा चुकीमुळे आपले नुकसान होतेच; मात्र अन्य वाहन चालकांना किंवा पादचार्‍यांना याची शिक्षा भोगावी लागते. एखाद्याचे कुटुंब उद्‍ध्वस्त होऊ शकते, असे स्पष्ट केले. रस्ता अपघात टाळण्यासाठी आणि सुरक्षितपणे वाहन चालवण्याचे अनोखे मार्ग जसे की रेडियम दिवे आणि कपडे वापरणे, विरुद्ध हाताने दरवाजा उघडणे, असे मार्गदर्शन विनय मोरे यांनी विद्यार्थ्यांना केले. प्रवास करताना लाईव्ह लोकेशन शेअर करणे, फोन नंबर लॉक स्क्रीनवर ठेवणे आदीची माहितीही या वेळी दिली. याप्रसंगी पोलिस निरीक्षक के. डी. कोल्हे, नीलेश मराठे उपस्थित होते. प्राचार्य डॉ. मोहन काळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृतीय वर्षाचे विद्यार्थी मयूरेश कारंडे यांनी केले, तर अंतिम वर्षाची विद्यार्थिनी रिया कांबळे हिने आभार मानले. याप्रसंगी अभिजीत मराठे, प्रा. रूपाली येवले, प्रा. निलोफर खान, प्रा. तनिष्का ठाकरे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.