
‘इनर व्हील’ने जवानांसाठी उभारला दोन कोटींचा निधी
मुंबई, ता. २५ : वीर जवानांच्या कुटुंबियांना अभिवादन करण्यासाठी आणि त्यांच्या मदतीसाठी ‘इनर व्हील डिस्ट्रिक्ट ३१४’ तर्फे यंदा तब्बल दोन कोटी रुपयांचा निधी संकलित केला आहे. तसेच प्रख्यात गायक जावेद अली याच्या गायनाचा एक भव्य कार्यक्रम नरिमन पॉइंट येथील एनसीपीए सभागृहात उद्या (ता. २६) सायंकाळी ६.३० वाजता आयोजित केला आहे. या कार्यक्रमाची संकल्पना ‘इनर व्हील’चे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. कनक सक्सेना यांची आहे.
‘इनर व्हील’ ही जगातील महिला सेवा क्षेत्रातील सर्वांत मोठी संघटना आहे. ती तब्बल १०० देशांमध्ये कार्यरत असून मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे या शहरांमध्ये तिचे ३६०० महिला सदस्य आहेत. ‘इनर व्हील’च्या उपक्रमाला महिंद्रा राईज, एशियन पेंट्स आणि हरीश अँड बिना फाऊंडेशनचे पाठबळ आहे. या उपक्रमातून जो निधी उभा राहणार आहे, तो केंद्रीय गृहमंत्रालयाच्या ‘भारत के वीर’ या उपक्रमाला देणगीरूपाने दिला जाणार आहे. ‘भारत के वीर’ हा एक निधी असून त्याचे व्यवस्थापन ज्येष्ठ सरकारी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली केले जाते. लष्करी जवानांच्या ज्या कुटुंबांना गरज असेल त्यांना हा निधी समितीच्या माध्यमातून समप्रमाणात वितरित केला जातो.
स्वातंत्र्याची ७५ वर्षे ‘आझादी का अमृत महोत्सव’च्या माध्यमातून साजरी होत आहेत. या पार्श्वभूमीवर आम्ही हा देशभक्तीपर असा उपक्रम हाती घेतला आहे. वीरगती प्राप्त झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना मदत करण्याचा हा एक प्रयत्न आहे. यामुळे या कुटुंबांना एक चांगले आयुष्य जगता येऊ शकेल.
- मिता शेठ, जिल्हाध्यक्ष, इनर व्हील
‘इनर व्हील’चे कार्य
‘इनर व्हील’ ही महिलांची जगातील एक सर्वांत मोठी संघटना आहे. ही एक अराजकीय, धर्मनिरपेक्ष अशी संघटना असून तिचे उद्दिष्ट समाजातील गरजू आणि वंचित घटकांना मदत व सहकार्य करणे हे आहे. जिल्हाध्यक्ष मिता शेठ यांनी जे इतर उपक्रम हाती घेतले आहेत, त्यामध्ये सफाळे गावातील ग्रामीण आरोग्य निगा केंद्राचा समावेश आहे. तसेच शहरी भागातील वाढत्या गरजा लक्षात घेऊन ज्येष्ठ नागरिकांसाठी डे केअर सेंटर व गार्डन ऑफ ट्रँक्विलिटीची उभारणी के. जी. मेमोरियल इन्फर्निटी येथे केली गेली आहे. त्याशिवाय एका सायकोलॉजी क्लिनिक अँड रिसर्च सेंटरची उभारणीही कामा रुग्णालय येथे केली गेली आहे. त्याशिवाय संस्थेने पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या अनेक स्थानकांवर थंड पाण्याचे ५० कूलर बसवले असून त्याचा फायदा लाखो लोकांना झाला आहे.