रिक्षा बंदमुळे प्रवाशांचे हाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रिक्षा बंदमुळे प्रवाशांचे हाल
रिक्षा बंदमुळे प्रवाशांचे हाल

रिक्षा बंदमुळे प्रवाशांचे हाल

sakal_logo
By

मीटर रिकॅलिब्रेशन मुदतवाढीसह दंडाविरोधात चालकांचा बंद
वसई ता. २५ (बातमीदार) : रिक्षा व टॅक्सी मीटर रिकॅलिब्रेशनला मुदतवाढ मिळावी, मीटर प्रमाणीकरण न केल्यास प्रतिदिन आकारण्यात येणारा पन्नास रुपयांचा दंड रद्द करावा, या मागणीसाठी बुधवारी रिक्षा आणि टॅक्सी बंद पुकारण्यात आला होता. या बंदमध्ये मोठ्या संख्येने रिक्षा आणि टॅक्सीचालक सहभागी झाल्याने सर्वसामान्य प्रवाशांसह नोकरदार वर्गाचे मोठे हाल झाले.
प्रवाशांना सुविधा मिळत असल्याने अधिकाधिक प्रवासी रिक्षाने प्रवास करतात; मात्र बुधवारी जिल्ह्यातील रिक्षा आणि टॅक्सीचालकांनी मीटर रिकॅलिब्रेशनला मुदतवाढ देण्याच्या मागणीसह प्रादेशिक परिवहन विभागाकडून यावर करण्यात येणाऱ्या कारवाईविरोधात एक दिवसाचा बंद पुकारला होता. यामुळे सर्वत्र रस्त्यांवर शुकशुकाट पसरला होता. त्यामुळे चाकरमान्यांना व सर्वसामान्य प्रवाशांना सकाळी कामावर जाण्यासाठी रिक्षा न मिळाल्याने पायी प्रवास करत रेल्वेकडे धाव घेण्यात आली.
वसई, नालासोपारा, विरार, वैतरणा, पालघर, वाणगाव, बोर्डी, घोलवड, मनोर, वाडा, तलासरी, बोईसर, डहाणू, सफाळे, केळवे परिसरात सार्वजनिक वाहतुकीसाठी सोपा पर्याय म्हणून प्रवाशांना रिक्षांचा आधार आहे; मात्र बुधवारी रिक्षा बंदमुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण विभागाने ६ जानेवारीपासून मीटर रिकॅलिब्रेशनसाठी ५० रुपये प्रतिदिन व परवाना निलंबन तथा जास्तीत जास्त पाच हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्याचे लेखी आदेश काढले आहेत. सध्या प्रतिव्यक्ती शेअरप्रमाणे दर आकारले जात आहेत. तसेच पालघर जिल्ह्यातील सर्व भाडे शेअर रिक्षाप्रमाणे यापूर्वीच मंजूर करण्यात आले. असे असताना कोणतीही पूर्वकल्पना व सूचना रिक्षा संघटनांना न देता केवळ आदेश काढून दंड आकारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे रिक्षाचालक, संघटनांकडून हा बंद पुकारण्यात आला.
वसईत औद्योगिक वसाहत मोठ्या प्रमाणात आहे. या ठिकाणी मुंबई, ठाणे, पनवेल, पालघर जिल्ह्यांतून कामगार ये-जा करतात; मात्र सकाळपासून रिक्षा बंद असल्याने त्यांना चालत कारखान्यात जावे लागले; तर रेल्वेने जाणाऱ्या प्रवाशांची ठरलेली लोकलची वेळ गाठण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागला. रिक्षा तळ ओस पडले होते; तर रस्त्यांवरदेखील रिक्षा दिसत नव्हत्या, त्यामुळे प्रवाशांची दमछाक झाली.

....
प्रादेशिक परिवहन विभागाने मीटर रिकॅलिब्रेशनबाबत दंडाची अंमलबजावणी सुरू केली आहे. यामुळे कर्ज घेऊन रिक्षा व्यवसाय करणारे अडचणीत आले आहेत. त्यामुळे हा दंड तात्काळ रद्द करावा.
- विजय खेतले, अध्यक्ष, ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक महासंघ
-----------------
वाडा तालुक्यात रिक्षा बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला आहे. आमच्या मागणीची दखल शासनाने घेऊन त्वरित निर्णय जाहीर करावा.
- जयवंत पालकर, अध्यक्ष, जय हिंद रिक्षा चालक-मालक संघटना, वाडा
----------------
अन्यथा परिवहन आयुक्तांना घेराव
मीटरप्रमाणे रिक्षा सुरू करा असे आदेश दिल्यानंतर रिक्षाचालकांनी दंड व निर्णयाविरोधात बंदची हाक दिली, पण यानंतरदेखील निर्णयात बदल केले नाहीत, तर परिवहन आयुक्तांना घेराव घालण्यात येईल, असा इशारा ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक महासंघाने दिला आहे.
-------------
कामावर जाताना सकाळी रिक्षा बंद असल्याने पायी प्रवास करत लोकल पकडण्यासाठी रेल्वे स्थानक गाठावे लागले. रोज रिक्षाने प्रवास करतो; मात्र बुधवारी रिक्षाच नव्हत्या. त्यामुळे हाल झाले.
- प्रफुल्ल मोरे, प्रवासी
------------------------
बोर्डीतील प्रवाशांची तारांबळ
बोर्डी, (बातमीदार) : बोर्डीतील रिक्षाचालक संपात सहभागी झाले होते. वाहतूक संघटनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत येथील सुमारे शंभर रिक्षाचालकांनी संपात सहभाग नोंदवला. संपामुळे घोलवड-बोर्डी रोड रेल्वे स्थानकांदरम्यान दररोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांची मात्र तारांबळ उडाली होती.
........

पालघर स्थानकात प्रवाशांची गर्दी
पालघर (बातमीदार) : रिक्षा आणि टॅक्सी बंद असल्याने चाकरमान्यांची तारांबळ उडाली. पालघर रेल्वे स्थानकावर मुंबई, गुजरातकडून येणारे चाकरमानी व इतर नागरिक रिक्षा नसल्याने स्थानकावर थांबल्याने गर्दी झाली होती. बंदमुळे एसटीने जादा बसची व्यवस्था केली असली, तरी ती ठराविक गावांपुरती मर्यादित होती. यामुळे पालघर शहरातील औद्योगिक परिसर, जिल्हा मुख्यालय या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांचे मात्र हाल झाले. तसेच या बंदमुळे शाळेतील मुलांना शाळेत पोहोचवणे व घेऊन येण्यासाठी पालकांना मोठी कसरत करावी लागली. तसेच काही चाकरमान्यांना आपल्या नोकरीच्या ठिकाणी जाण्यासाठी कोणतीच सोय नसल्याने दांडी मारावी लागली.
रिक्षाचा बंद असल्याने पालघर एसटी आगाराने जादा बसची व्यवस्था केली होती. पालघर आगारात लांब पल्ल्याच्या गाड्या आल्यानंतर त्याला एक एक फेरी सातपाटी केळवे माहीम बोईसर या ठिकाणी जादा बसची व्यवस्था करण्यात आली होती व पालघर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी झाली तर जादा बस सोडण्यात येत होती. यासाठी रेल्वे स्थानकाजवळ वाहतूक नियंत्रक अजय संखे हे व्यवस्था पाहत होते. पालघर शहरात १५०० तीन आसनी; तर सहा आसनी ४०० रिक्षाचालक बंदमध्ये सहभागी झाले होते, अशी माहिती पालघर रिक्षा चालक-मालक संघटनेचे सुनील जगताप यांनी दिली.

....
मीटर रिकॅलिब्रेशनकरिता लावलेला पन्नास रुपये अवाजावी दंड रद्द झाला पाहिजे. तसेच पालघर येथे रिक्षा पासिंग ट्रॅक उपलब्ध करून देऊन पालघर येथे रिक्षा पासिंग चालू करावे, या मागणीसाठी जिल्ह्यातील सर्व रिक्षाचालकांचा आज बंद आहे.
- मनोज घरत, पालघर रिक्षा चालक-मालक संघटना

पालघर रेल्वे स्थानकावरून रिक्षा बंद असल्याने काही गावांसाठी जादा बसची व्यवस्था करण्यात आली होती. पालघर-बोईसर, पालघर-केळवे माहीम व सातपाटी या ठिकाणी जादा बस सोडण्यात आल्या आहेत.
- नितीन चव्हाण, व्यवस्थापक, एसटी आगार, पालघर