
वसईत बाप्पाचे उत्साहात आगमन
वसई, ता. २५ (बातमीदार) : माघी गणेश जयंतीनिमित्त घरगुती व सार्वजनिक गणेशमूर्तींची मोठ्या उत्साहात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. वसई तालुक्यातील विविध ठिकाणी असणाऱ्या गणपती मंदिरातदेखील धार्मिक उत्सवाची रेलचेल सुरू असून भाविकांकडून दर्शनासाठी रीघ लागली होती.
यंदा वसई तालुक्यात ७० सार्वजनिक व घरगुती एक हजार ३३० मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे. बाजारपेठेत पूजेचे साहित्य, फुले, दुर्वासह फुलांची मागणी वाढली आहे. वसई, नालासोपारा, विरार येथे बाजारपेठा सजल्या आहेत; तर सावर्जनिक मंडळात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
देवबांधच्या मंदिरात भक्तांची मांदियाळी
मोखाडा (बातमीदार) : मोखाड्यातील देवबांध नदीच्या किनाऱ्यावरील सुंदर नारायण गणेश मंदिरात माघी गणेश जयंतीनिमित्त मोठ्या प्रमाणात भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. यात ठाणे, नाशिक आणि पालघर जिल्ह्यातील भक्तांची संख्या सर्वाधिक होती.
सह्याद्री आदिवासी बहुविध सेवा संघाकडून देवबांध येथील सुंदर नारायण गणेश मंदिरात माघी गणेश जयंतीला गणेशोत्सव साजरा केला जातो. दोन वर्षांनंतर यंदा हा उत्सव मोठ्या जल्लोष आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला आहे. या वेळी संघाचे अध्यक्ष अशोक मोडक यांच्या हस्ते १५ शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच या वर्षी पंधरा ते वीस हजार भक्तांनी या वेळी दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेतला असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले.