
माथाडीच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष
नवी मुंबई, ता. २५ ः माथाडी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाने त्वरित लक्ष घालावे; अन्यथा १ फेब्रुवारीला एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारण्यात येईल, असा निर्वाणीचा इशारा महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्स्पोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते नरेंद्र पाटील यांनी दिला आहे. माथाडी भवन येथे महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्स्पोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या झालेल्या संयुक्त बैठकीत हा इशारा देण्यात आला आहे.
माथाडी कामगारांच्या विविध समस्यांकडे सरकारने आजतागायत दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे माथाडी कामगारांशी निगडित विविध प्रश्न प्रलंबित आहेत. त्यात सल्लागार समितीची पुनर्रचना करणे, सल्लागार समितीवर कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची सदस्य म्हणून नेमणूक करणे, सुरक्षा रक्षक कामगार सल्लागार समितीची पुनर्रचना करणे, विविध माथाडी मंडळाच्या पुनर्रचना करून माथाडी मंडळांवर युनियनच्या सभासद संख्येच्या प्रमाणात सदस्यांच्या नेमणुका करणे, माथाडी मंडळाच्या कार्यालयीन सेवेत माथाडी कामगारांच्या मुलांना प्राधान्य देणे, अनुज्ञाप्तीधारक तोलणार/मापाडी कामगारांना बाजार समितीच्या कार्यालयीन सेवेत घेणे, माथाडी कामगारांच्या हक्काच्या कामात अडथळा आणून कामगारांवर दहशत करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना आळा घालण्यासाठी गृह खात्याने संबंधितांची समिती गठित करावी, अशा विविध मागण्यांसाठी सातत्याने संघटनांनी सरकारकडे पाठपुरावा केला आहे; मात्र या प्रश्नांकडे कामगार, गृह, पणन व सहकार आणि संबंधित खात्यांनी दुर्लक्षच केले असल्याने माथाड्यांच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी माथाडी कामगार एकदिवसीय संप करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. या सभेत युनियनचे कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप तसेच जितेंद्र येवले, पोपटराव धोंडे, सूरज बर्गे, पांडुरंग धोंडे, संतोष अहिरे, अजय इंगुळकर, नाशिकचे पोटे, संभाजीराव जाधव यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.