पंतप्रधानंच्या दौऱ्यासाठी पालिकेचा कोट्यवधींचा खर्च | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पंतप्रधानंच्या दौऱ्यासाठी पालिकेचा कोट्यवधींचा खर्च
पंतप्रधानंच्या दौऱ्यासाठी पालिकेचा कोट्यवधींचा खर्च

पंतप्रधानंच्या दौऱ्यासाठी पालिकेचा कोट्यवधींचा खर्च

sakal_logo
By

पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी पालिकेचा कोट्यवधींचा खर्च
एक लाखांच्या गर्दीसाठी पालिकेकडून व्यवस्था
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : मुंबई महापालिकेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १९ जानेवारीच्या दौऱ्याच्या निमित्ताने तब्बल १० कोटी रुपये खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. या कार्यक्रमासाठी सर्व बाबींची काटेकोरपणे पूर्तता असावी, यासाठी मुंबई महापालिकेने खर्च केला होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पालिकेने लाखो लोकांच्या बैठकीची व्यवस्था केली होती.
मुंबई पालिकेची एक टीम या पंतप्रधान दौऱ्याच्या निमित्ताने आधीपासूनच कामाला लागली होती. पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमात कोणतीही कसर राहू नये, यासाठी सगळ्या टीमने आधीपासूनच या कार्यक्रमाची जय्यत तयारी केली होती. या कार्यक्रमासाठी सुरक्षा व्यवस्थेपासून ते रोषणाई आणि मनोरंजनाचा कार्यक्रम अशा सर्व कामांची तयारी करण्यात आली होती. या सगळ्या कार्यक्रमासाठी एकूण १० कोटी रुपयांचा खर्च झाला होता. तब्बल एक लाख लोकांच्या निमित्ताने ही सर्व व्यवस्था करण्यात आली होती.

या कार्यक्रमांचे आयोजन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ३८ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांच्या कामांचा शुभारंभ केला होता. त्यामध्ये मुंबई महापालिकेच्या २६ हजार कोटींच्या एसटीपी प्लांटच्या उद्घाटनाचे काम, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा मेकओव्हर, मेट्रो ७ आणि मेट्रो २ अ चे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले. त्यासोबतच पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत कर्जाच्या रकमेचे वितरणही या वेळी १ लाख फेरीवाल्यांना करण्यात आले.

पालिकेने केलेली व्‍यवस्‍था
फेरीवाल्यांना कार्यक्रमासाठी आणण्यासाठी पालिकेने बेस्टच्या बसेसची व्यवस्थाही केली होती. महत्त्‍वाचे म्हणजे सभेसाठी हजर राहणाऱ्या एक लाख नागरिकांच्या आसनव्यवस्थेची जबाबदारी पालिकेने पार पाडली. त्यासाठी मैदानात लागणारी रोषणाई करतानाच सुरक्षा व्यवस्थेसाठी पोलिस बंदोबस्त आणि खासगी सुरक्षा रक्षक यांचीही मोठी कुमक पालिकेकडून देण्यात आली होती. पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी पालिकेने मनोरंजनाचा कार्यक्रमही ठेवला होता. या कार्यक्रमासाठी वेगळे स्टेजही बांधण्यात आले होते; तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्र्यांसाठी तसेच निमंत्रितांसाठीही विशेष स्टेजची व्यवस्था करण्यात आली होती. लाखोच्या संख्येने उपस्थित जनतेला स्टेजची दृश्ये दिसावीत म्हणून एलईडी स्क्रिनही लावण्यात आल्या होत्या. आमदार आणि खासदार तसेच व्हीव्हीआयपी यांच्या व्यवस्थेसोबतच पत्रकारांसाठीही आसनव्यवस्था करण्यात आली होती. तसेच या कार्यक्रमाच्या दरम्यान दाखवण्यात आलेल्या चित्रफिती, प्रसारासाठीचा खर्च असा एकत्रित खर्च या कार्यक्रमाच्या निमित्ताने करण्यात आला.