तीन ठिकाणी नवीन एनआयसीयू, एकाची क्षमता वाढवणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तीन ठिकाणी नवीन एनआयसीयू, एकाची क्षमता वाढवणार
तीन ठिकाणी नवीन एनआयसीयू, एकाची क्षमता वाढवणार

तीन ठिकाणी नवीन एनआयसीयू, एकाची क्षमता वाढवणार

sakal_logo
By

बालमृत्यू दर कमी करण्यासाठी आरोग्‍य यंत्रणेचे सक्षमीकरण
तीन ठिकाणी नवीन एनआयसीयू; एकाची क्षमता वाढवणार

भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : पालिकेच्या आरोग्य यंत्रणेत आणखी सुधारणा करण्यासाठी आणि बालमृत्यू दर कमी करण्यासाठी पालिकेने महत्त्वाचे पाऊल टाकायला सुरुवात केली आहे. गोवर आजारामध्ये बालकांच्या एनआयसीयूची वाढती गरज असल्याचे समोर आले होते. त्यासाठी सर्वांत जास्त गोवर रुग्ण आढळलेल्‍या गोवंडी परिसरातील शिवाजी नगर मॅटर्निटी होममध्ये लहान मुलांसाठी १० बेडचे एनआयसीयू सुरू केले जात आहे. यासह पश्चिम उपनगरांत दोन आणि पूर्व उपनगरात दोन एनआयसीयूची सुविधा आऊटसोर्स पद्धतीने सुरू करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

गोवंडी, शिवाजी नगरमधील एनआयसीयू तयार झाले आहे. येथील आणखी एका मॅटर्निटी होममध्ये एनआयसीयूची सोय सुरू करू, असेही आरोग्य अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. माता व बालक रुग्णालयातील एनआयसीयूचे स्ट्रक्चर तयार असून आऊटसोर्ससाठी प्रक्रिया सुरू असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. गंभीर आजाराच्‍या लहान मुलांच्या उपचारांसाठी अनेकदा एनआयसीयूची गरज पडते. एनआयसीयूची मागणी जास्त असली तरी रुग्णालयात लहान मुलांना एनआयसीयू मिळत नाही. हीच गरज लक्षात घेऊन पालिका अधिकारी एनआयसीयूच्या सक्षमीकरणावर भर देत आहेत.

कोविडनंतर गोवरदरम्यान आरोग्य यंत्रणेत अनेक त्रुटी जाणवल्यानंतर पालिकेने प्रमुख रुग्णालयांसह प्राथमिक दवाखाने, आरोग्य केंद्र आणि उपनगरीय रुग्णालयांची क्षमता दुप्पट करण्याचा निर्णय घेतला. नवीन रुग्णालयांच्या बांधणीसह अनेक रुग्णालयांची डागडुजी, विस्तारीकरण सुरू आहे. याचबरोबर आता पालिका नवीन चार एनआयसीयू सुरू करण्याच्या तयारीत आहे. गोवंडीतील शिवाजी नगर मॅटर्निटी होम, प्रभादेवी मॅटर्निटी होम, शिरोडकर मॅटर्निटी होम, तसेच चेंबूर आणि खेरवाडी मॅटर्निटी होम ही नावे प्रस्तावित आहेत. यापैकी शिवाजी नगरचे एनआयसीयू तयार आहे; तर बोरिवलीच्या माता व बालक रुग्णालयात असणाऱ्या एनआयसीयूचे सक्षमीकरण केले जात आहे.

ज्या नागरिकांना एनआयसीयूच्या उपचारांचा खर्च परवडत नाही, अशांना या चारही रुग्णालयांमध्ये दिलासा मिळणार आहे. माता व बालक या रुग्णालयात आधीपासून १० बेडेड एनआयसीयू होते, पण तिथे इतर सुविधांची गरज असल्याने एचआर सिस्टीम सुरू केली जाईल. तसेच शिवाजी नगर मॅटर्निटी होममध्ये यापूर्वी एनआयसीयूची सुविधा नव्हती. गेल्या वर्षी भांडुप सवित्रीबाई फुले रुग्णालयात सुरू केलेल्या एनआयसीयू स्ट्रक्चरच्या धर्तीवर शिवाजी नगर आणि इतर तीन ठिकाणी आऊटसोर्स पद्धतीने एनआयसीयूची पद्धत सुरू करू असे पालिकेच्या आरोग्य विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सकाळला सांगितले.
........................................
आऊटसोर्स म्हणजे खासगी प्रक्टिशनर्स या ठिकाणी उपचार देतील. त्यांना एका रुग्णापाठी मानधन दिले जाते.
..........................................
शिवाजी नगर - १० बेड्स एनआयसीयू
शिरोडकर - ५ बेड्स
माता व बालक - १० बेड्स
प्रभादेवी मॅटर्निटी होम - १० बेड्स
..........................................