असंसर्गजन्य आजारग्रस्त मुंबईकरांना हेरणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

असंसर्गजन्य आजारग्रस्त मुंबईकरांना हेरणार
असंसर्गजन्य आजारग्रस्त मुंबईकरांना हेरणार

असंसर्गजन्य आजारग्रस्त मुंबईकरांना हेरणार

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २५ : मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरात असंसर्गजन्य आजाराच्या रुग्णांना शोधण्याची मोहीम हाती घेतली आहे. यासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे क्लिनिकमध्ये तपासणी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ३० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या १३ टक्के मुंबईकरांना उच्च रक्तदाबाचे निदान झाल्याचे समोर आल्याने असंसर्गजन्य आजारांच्या रुग्णांचा शोध घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यात ‘आपला दवाखाना’ महत्त्वाची भूमिका बजावणार असून, जे दवाखान्यापर्यंत आले नाहीत, अशा मुंबईकरांची घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येणार आहे.

आम्हाला मुंबईकरांना निरोगी ठेवायचे आहे. याच पार्श्वभूमीवर असंसर्गजन्य आजारांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. मुंबईकरांनी याला चांगला प्रतिसाद दिल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले. या तपासणी मोहिमेमुळे मुंबईतील असंसर्गजन्य आजाराच्या रुग्णांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल. तसेच असंसर्गजन्य आजाराच्या सुरुवातीच्या टप्प्यातील रुग्ण या मोहिमेतून त्वरित समोर येतील. यातून रक्तदाब तसेच मधुमेही रुग्णांची संख्याही समजू शकणार असल्याने घरोघरी तपासणी मोहीम सुरू करण्यात आल्याचे डॉ. कुमार यांनी सांगितले.

घरोघरी तपासणीतून सुटलेले मुंबईकर आपला दवाखान्यात येऊन तपासणी करतील. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्यांची संख्या १०० वर जाणार आहे. आतापर्यंत या दवाखान्यांचा दोन लाखांहून अधिक मुंबईकरांनी लाभ घेतला आहे, अशी माहिती पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.

हृदयविकार, हृदयविकाराचा झटका आणि मधुमेह या आजारांतून मुंबईत एकत्रितपणे दरवर्षी ४० टक्के मृत्यू होतात. गेल्या वर्षी महापालिकेने जागतिक आरोग्य संघटनेच्या मदतीने आजारांचे सर्वेक्षण केले होते. यातून १८ ते ६९ वयोगटातील सुमारे १८ टक्के मुंबईकरांमध्ये रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण वाढल्याचे, तसेच रक्तदाब तपासणीत ११ टक्के प्रमाण दिसून आले. त्यामुळे उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचे लवकर निदान झाल्यास तातडीने पावले उचलण्यास मदत होईल.
- डॉ. मंगला गोमारे, कार्यकारी आरोग्य अधिकारी, पालिका