
पोलिसांत तक्रार दिल्याने मेव्हण्यांना मारण्याचा प्रयत्न
नवी मुंबई, ता. २८ (वार्ताहर) : पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याने संतप्त झालेल्या एकाने त्याच्या दोन मेव्हण्यांच्या अंगावर कार चालवून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना तळोजा भागात घडली आहे. फैजल नाझीम अन्सारी (वय २६) असे संशयित आरोपीचे नाव असून तळोजा पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
फैजल नाझीम अन्सारी हा गोवंडी येथे राहण्यास असून त्याचा तळोजा फेज २ येथील शहरीन हिच्यासोबत निकाह झाला होता. लग्नानंतर त्यांच्यामध्ये वारंवार वाद होत असल्यामुळे तो तिला मारहाण करत होता. फैजलने शहरीनसोबत भांडण करून तिला २४ जानेवारीच्या पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास कारमधून तळोज्यातील तिच्या आई-वडिलांच्या घराजवळ नेले. या वेळी त्याने इमारतीच्या खालीच तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे तिचे भाऊ शाहनवाज अब्दुल मलीक अन्सारी (वय १९) व मोहम्मद शाहवेज (२२) यांनी फैजल याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र फैजलने दोघांना शिवीगाळ करून त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे या दोघांनी तळोजा पोलिस ठाण्यात फैजलविरोधात अदखलपात्र तक्रार नोंद केली. याचा राग फैजलला आल्याने तो त्याच भागात कारमध्ये लपून राहिला. सकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास शाहनवाज व मोहम्मद शाहवेझ हे नमाजवरून घरी परतताना, त्या भागात दबा धरून बसलेल्या फैजलने दोघांच्या अंगावर पाठीमागून कार चालवत पलायन केले. कारच्या धडकेत दोघांना गंभीर दुखापती झाल्याने पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.