
शहापुरात भव्य चित्रकला स्पर्धा उत्साहात
खर्डी, ता. २८ (बातमीदार) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परीक्षेवर चर्चा उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या मनात परीक्षेबद्दल असलेली भीती कमी करून त्यांनी आनंदात परीक्षेला सामोरे जावे, या उद्देशाने भाजपाचे केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री तथा भिवंडी लोकसभा खासदार कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहापुरातील वैश्य समाज हॉल या ठिकाणी भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शहापूर तालुक्यातील इयत्ता सातवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी अ, ब, आणि क गट अशा स्वरूपात स्पर्धा पार पडल्या. अ गटात प्रथम राणी चौधरी, द्वितीय शंभू भांगरे, तृतीय प्रभात जाधव; ब गटात प्रथम विद्या सुरसे, द्वितीय मयुरेश भावसार, तृतीय किंजल बिडवी; क गटात प्रथम चर्वी आंबवणे, द्वितीय सौरव निचिते, तृतीय श्रेया अवसरे या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले असून त्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. या स्पर्धेत वासिंद येथील सरस्वती, आयडियल स्कूल, शहापुरातील ग. वि. खाडे, धर्मवीर आनंद दिघे, जन कल्याण आदी विद्यालयातील शिक्षकवृंदांसह तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. याप्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष भास्कर जाधव, नगरसेवक विवेक नार्वेकर, राम जागरे, प्रमोद बसवंत, कमलाकर घरत, योगेश ठाकरे, तुकाराम भाकरे, हरेश निचिते, अतुल शिंदे आदी भाजप पदाधिकाऱ्यांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.