
फेब्रुवारी अखेर ‘फुल्ल टू धम्माल’
वाशी ः बातमीदार
नवी मुंबई शहरातील लँडमार्क म्हणून ओळख असलेल्या नेरूळ येथील वंडर्स पार्क नव्या मोसमासाठी सज्ज झाले आहे. कारण कोरोनाकाळापासून जवळजवळ अडीच वर्षे सर्वसामान्यांसाठी बंद असलेले हे पार्क फेब्रुवारीअखेर पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवी मुंबई शहराबरोबरच उरण, पनवेल, ठाणे, मुंबई परिसरातील आबालवृद्धांपासून बच्चे कंपनीचे आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या या पार्कमध्ये आकर्षक खेळांमुळे लवकरच मनोरंजनाचा नवा हंगाम सुरू होणार आहे.
-----------------------------------------
नवी मुंबई महापालिकेने शहरातील नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी वंडर्स पार्कची संकल्पना अस्तित्वात आणली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते या पार्कचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर वंडर्स पार्कमध्ये असलेली आकर्षक खेळणी, जगातील सात आश्चर्य दाखवणाऱ्या प्रतिकृती यासह अॅम्पिथिएटरबरोबरच आकर्षक तलाव खेळण्यासाठी असलेली प्रशस्त खेळण्याची जागा, यामुळे नेहमीच आकर्षणाचे केंद्रबिंदू राहिले होते. अशातच आता महापालिकेने नव्याने केलेल्या कामांमुळे वंडर्स पार्क पुन्हा मनोरंजनाच्या नव्या हंगामासाठी सज्ज झाले आहे. वंडर्स पार्कचे संपूर्ण मेकओव्हर करण्यात येत असून महापालिकेने जवळपास २१ कोटी रुपयांचा निधी या उद्यानासाठी खर्च केला आहे. त्यात म्युझिकल फाऊंटन लेझर शो-सह, नवीन ऑडिओ दृश्य यंत्रणा, तलावांची दुरुस्ती, वॉक वे-तील सुधारणांसह विविध खेळांच्या साहित्याचे नवनवीन प्रकार आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणार आहे. यासाठीची वीज व्यवस्थेसाठी आवश्यक असलेली काही कामे सुरु असून आकर्षक खेळण्यांची देखील ट्रायल घेण्यात येत आहे. त्यामुळे लवकरच वंडर्स पार्कमधील नवी मुंबईकरांची पुन्हा गजबज पाहावयास मिळणार आहे.
--------------------------------------------------------------
कामे अंतिम टप्प्यात
नेरूळमधील वंडर्स पार्कला नेहमीच नागरिकांची पसंती मिळाली आहे. या उद्यानात नवी मुंबईसह ठाणे, खारघर, उरण, पनवेल येथून टॉयट्रेन तसेच विविध खेळण्यांची मजा घेण्यासाठी नागरिक येत असतात; परंतु आता खेळण्यांमध्येही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे नव्याने सुरू होणाऱ्या वंडर्स पार्कची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. सध्या उद्यानातील खेळण्यांखालील रबर मॅट बदलणे, सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे, प्रवेशद्वारावर बायोमॅट्रिक मशीन लावणे, नवीन विद्युत दिवे, उद्यानात आकर्षक कारंजे अशी कामे अंतिम टप्प्यात आली आहेत.
--------------------------------------------
नवीन सायन्स सेंटरची उत्सुकता
नवी मुंबई शहरात वंडर्स पार्कबरोबरच रॉक गार्डन निसर्ग उद्यान, घणसोली पार्क, संवेदना उद्यान अशी अनेक उद्याने नागरिकांना आकर्षित करीत आहे. फेब्रुवारीअखेरपर्यंत वंडर्स पार्क नव्याने सुरुवात करण्याची जोरदार तयारी प्रशासनाने केली आहे. याच पार्कच्या शेजारी आकर्षक ठरणारे सायन्स सेंटरही अस्तित्वात येत आहे. त्याचे कामही वेगाने सुरू असून या दोन्ही ठिकाणच्या वीजव्यवस्थेसाठी लागणारे सबस्टेशनचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या दोन्ही ठिकाणांची सबस्टेशन एकाच ठिकाणी असल्याने वंडर्स पार्क सुरू करण्यास उशीर होत असल्याचे बोलले जात आहे.
-------------------------------------
या ठिकाणच्या सबस्टेशनचे काम सुरू आहे. महिनाभरात हे काम पूर्ण होऊन फेब्रुवारीअखेरपर्यंत वंडर्स पार्क सुरू करण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे.
- नितीन नार्वेकर, उपायुक्त, उद्यान विभाग
-------------------------------
वंडर्स पार्क येथे मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आला असून खेळण्यांमध्येही वाढ करण्यात आली आहे. तसेच या ठिकाणी नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या म्युझिकल शो यासह या पार्कला अधिक देखणे रूप देण्याचा प्रयत्न आहे.
- संजय देसाई, शहर अभियंता, नमुंमपा