जलविक्रीतून प्रवाशांची लुट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जलविक्रीतून प्रवाशांची लुट
जलविक्रीतून प्रवाशांची लुट

जलविक्रीतून प्रवाशांची लुट

sakal_logo
By

प्रमोद जाधव ः सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता.३०ः एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना स्वस्त दरात शुद्ध पाणी मिळावे, म्हणून एसटी महामंडळाने सुरू केलेली नाथजल पाणीविक्री वादात सापडण्याची शक्यता आहे. कारण जिल्ह्यातील अलिबाग, रामवाडी, पोलादपूर व पेण स्थानकांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी निर्धारित किमंतीपेक्षा प्रवाशांना पाच रुपये अधिक मोजावे लागत असल्याने स्टॉलचालकांकडून आर्थिक लुट केली जात आहे.
सर्वसामान्य प्रवाशांसाठी सोयीचे वाहतुकीचे साधन म्हणून एसटीला पसंती मिळते. त्यामुळे शहरी असो या ग्रामीण भागात एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. आजच्या घडीला वाहतुकीची विविध साधने उपलब्ध असताना देखील आजही एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. त्यामुळे प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एसटी महामंडळाकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. त्यामध्ये प्रवाशांसाठी स्वस्त दरात पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था स्थानकात उपलब्ध केली आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, रामवाडी, माणगाव, पोलादपूर, पेण येथे नाथजलचे स्टॉल सुरु केले आहेत. पण या स्थानकातील स्टॅाल विक्रेत्यांकडून पंधरा रुपयांना मिळणारी पाण्याची बाटली वीस रुपयांना विकली जात असल्याने प्रवाशांची आर्थिक लुट होत असल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांसाठी असलेल्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी जादा पैसे मोजण्याची वेळ आल्याने नाराजी आहे.
--------------------------------------
आगार व्यवस्थापकाचे दुर्लक्ष
बस स्थानकांमध्ये येणाऱ्या प्रवाशांना दुय्यम दर्जाची वागणूक नाथजल विक्रेत्यांकडून दिली जात आहे. तसेच पंधरा रुपयांना मिळणाऱ्या पाण्याची बाटली वीस रुपयांना विकली जात असल्याने प्रवाशांवर पाच रुपये अधिक मोजण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे, बस स्थानकातील आगार प्रमुख व आगार व्यवस्थापकांचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
-------------------------
प्रवाशांसाठी स्तुत्य उपक्रम
एसटी महामंडळाचे अधिकृत पेयजल पुणे येथील मे. शेळके बेव्हरेजेस प्रा.लि.या एजन्सीद्वारे नाथजल नावाने बाटली बंद पाणी पुरवठा केला जात आहे. ६५० मिली लिटर पाण्याची बाटली अन्य कंपन्यांकडून २० ते २२ रुपयांना विकली जाते. परंतु, नाथजल पाण्याची बाटली १० रुपये तर एक हजार मिली लिटर पाण्याची बाटली १५ रुपये विकून प्रवाशांसाठी हा उपक्रम एसटी महामंडळाने सुरु केला आहे.
-------------------------------
नाथजल विक्रेत्याची मुजोरी
प्रवाशांना सवलतीच्या दरात पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी बस स्थानकात नाथजल विक्रेत्यांचे स्टॉल सुरु करण्यात आले आहे. पण नाथजल विक्रेत्याने १५ रुपयांची बाटली २० रुपयांना विकली जात असल्याने. याबाबत विचारणा केली तर तुम्हाला ज्याला तक्रार करायची आहे, त्याला करा. प्रशासन काय कारवाई करणार, असे उत्तर विक्रेत्यांकडून दिले जात आहे.
-------------------------------
जिल्ह्यातील बस स्थानकात नाथजल पंधरा रुपयांनी विकले जाते. तशा सूचना स्टॉलधारकांना आहेत. मात्र, तरी देखील २० रुपयांना पाणी विकले जात असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून आल्या आहेत. अशा स्टॉल धारकांविरोधात कारवाई केली जाईल. तसेच प्रत्येक स्थानकात फलक लावण्याच्या सूचना आगार व्यवस्थापकांना दिल्या जाणार आहेत.
-दीपक घोडे, विभाग नियंत्रक, रायगड