अतिक्रमणाला वरदहस्त कोणाचा? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अतिक्रमणाला वरदहस्त कोणाचा?
अतिक्रमणाला वरदहस्त कोणाचा?

अतिक्रमणाला वरदहस्त कोणाचा?

sakal_logo
By

वाशी, ता.३० (बातमीदार) ः रबाळे एमआयडीसीमधील गवतेवाडी येथील एमआयडीसीच्या भूखंडावर बेकायदा झोपड्या तसेच भंगारमाफियांनी अतिक्रमण केले आहे. अनेकदा या अतिक्रमणावर कारवाई झाली आहे. पण राजकीय वरदहस्तामुळे भंगार माफिया पुन्हा बस्तान बसवत असल्याने प्रशासकीय यंत्रणा हतबल झाल्या आहेत.
औद्योगिक वसाहती उभारण्यासाठी एमआयडीसीने ठाणे जिल्ह्यातील बेलापूर पट्ट्यामधील जमीन कवडीमोल भावाने भूमिपूत्रांकडून संपादित केल्या आहेत. या पट्ट्यामध्ये दिघा, रबाळे, नेरुळ, महापे, बोनकोडे सारख्या ठिकाणी एमआयडीसीने विविध कंपनींना भूखंडांची विक्री करून लघू तसेच मोठे उद्योग सुरु केले आहेत. मात्र, त्यातील अनेक उद्योगांना सध्या घरघर लागली असून तर काही कंपन्या बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे या बंद कंपन्यांतील भंगार चोरण्यात येत असून एमआयडीसीमधील चोऱ्यांचे प्रमाण देखील काही दिवसांपासून वाढले आहे. काही दिवसांपूर्वी उद्योगमंत्र्यांच्या झालेल्या बैठकीत उद्योजकांनी देखील भंगार चोरांचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे एमआयडीसीकडून कोणी अतिक्रमण करू नये, यासाठी पत्र्याचे कुंपण घातले होते. मात्र एमआयडीसीतील या भूमाफियांनी पत्र्याच्या कुंपणामध्येच शिरकाव करून पुन्हा त्या ठिकाणी झोपड्या तसेच भंगाराची दुकाने थाटली आहेत. महत्त्वाचे म्हणजे, काही राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने तर या अतिक्रमणाला गृहनिर्माण संस्था असल्याचे फलक लावत अधिकृत असल्याचे दाखवण्याचे प्रकारही होत आहेत. त्यामुळे कवडी मोल दराने भूमिपूत्रांचे भूखंड घेणाऱ्या एमआयडीसीने बेकायदा अतिक्रमणावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
-------------------------------------
चोरीच्या भगांराची खरेदी-विक्री
दिघा एमआयडीसीमधील चिंचपाडा, यादवनगर या ठिकाणी रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी मोकळे भूखंड होते. हे भूखंड भूमिपुत्रांकडून सरकारने संपादित केले आहेत. मात्र, सध्या या भूखंडावर भंगार विक्रेत्यांनी लोखंड, काचा, पत्रे, प्लास्टिकची मोठीमोठी गोदामे थाटली आहेत. या भंगारच्या दुकानामध्ये एमआयडीसीमधील बंद पडलेल्या कपंनीचा माल, चोरीचे असणारी वाहने, कंपनीचा स्क्रॅब माल येत असल्याचे यापूर्वीही निर्दशनास आले आहे.
------------------------------------------
माफियांच्या दहशतीचे दाखले
सन २००७ मध्ये महावितरण वसाहतीमध्ये भंगार चोरण्यासाठी आलेल्या टोळीकडून पोलिसांची देखील हत्या करण्याचा प्रकार घडला होता. तर दीघा येथील अंब्रेको या कंपनीमध्ये देखील भंगार चोरट्यांनी सुरक्षारक्षकांची हत्या केली होती. या घटनांमुळे या परिसरामध्ये भंगार विक्रेत्यांची दहशत आहे.
-------------------------------
एमआयडीसीच्या भूखंडावरील अतिक्रमणाची लवकरच पाहणी केली जाणार आहे. तसेच या अतिक्रमणाविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल.
-एस.पी.शिंदे, उप-अभियंता, एमआयडीसी