
नवी मुंबईकरांना अनुभवला जल्लोश, उत्साह
जुईनगर, ता.३०(बातमीदार)ः सीबीडी येथील सुनील गावस्कर मैदानात गेले दहा दिवस नवी मुंबई सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सव सुरू होता. या महोत्सवाची ‘मराठी दौलत लाखाची’ या मराठी नृत्यगीताच्या कार्यक्रमातून सांगता झाली. यावेळी श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्थेच्या सभासद महिला देखील कार्यक्रमात सहभागी झाल्याने जल्लोष, उत्साह निर्माण झाला होता.
श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था व सिडको यांच्या वतीने सांस्कृतिक, कला-क्रिडा क्षेत्रातील होतकरू, तरुण, विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिक कलाकारांना एक व्यासपीठ निर्माण व्हावे यासाठी नवी मुंबई सांस्कृतिक कला-क्रीडा महोत्सवाचे आयोजन गेली २७ वर्षे केले जात आहे. या माध्यमातून उपक्रमातून कलाकारांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याची संधी दिली जात आहे. आत्तापर्यंत या व्यासपीठावर तयार झालेले अनेक कलाकार राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करीत आहेत. त्यामुळे महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थी व महिलांना विशेष ऊर्जा मिळत असल्याने नवी मुंबईतील महिला या महोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात. यावेळी गेले दहा दिवस विविध प्रकारचे खाद्यपदार्थ, जीवनावश्यक वस्तूंचे स्टॉल्स तसेच मनोरंजनाचे विविध प्रकार कार्यक्रमांचे प्रमुख आकर्षण होते. याच बरोबर हळदी कुंकू समारंभ, मेहंदी व पाककला, आम्ही दोघे राजराणी यांसारख्या मनोरंजनपर कार्यक्रमात महिलांचा जल्लोश, उत्साह पाहण्यासारखा होता.
-------------------------------------------------
ज्येष्ठ नागरिकांची लक्षणीय उपस्थिती
या महोत्सवात विशेष करून ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती लक्षणीय ठरली. यावेळी महाराष्ट्रातील नामवंत कलाकारांनीही महोत्सवात आपली कला सादर उपस्थितांचे मनोरंजन केले. महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी झालेल्या मोफत महाआरोग्य शिबिराचा हजारो नागरिकांनी लाभ घेतला. तर महोत्सवाची सांगता सोहळ्यात थोरा-मोठ्यांनी नृत्य करून महोत्सवाचा आनंद लुटला.
-----------------------------------------------------
सीबीडी येथे दहा दिवस सुरू असलेला या महोत्सवात विविध उपक्रम पार पडले. तसेच हा महोत्सव यशस्वी झाल्याचे खरे श्रेय मी नवी मुंबईतील कलाकार, स्पर्धक तसेच संस्थेच्या सर्व सभासदांना देत आहे.
- मंदा म्हात्रे, आमदार, भाजप