
आदिवासींना दिली मायेची उब
मोखाडा, ता. ३० (बातमीदार) : आपल्या मुलाचा अथवा कुटुंबातील सदस्याचा वाढदिवस धामधुमीत साजरा करण्याचा आताचा ट्रेंड आहे. मात्र, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी गेल्या चौदा वर्षांपासून आपला मुलगा अनुरागचा वाढदिवस विविध सामाजिक हिताचे उपक्रम राबवीत करत आहेत. या वर्षी त्यांनी सपत्निक आपल्या मुलाच्या वाढदिवसाला कुपोषित बालके, त्यांच्या माता आणि खेड्यातील ५०० आदिवासींना स्वेटर आणि ब्लँकेटची मदत करून त्यांना मायेची उब देत साजरा केला आहे. यात ग्रामीण रुग्णालयात १२५ कुपोषित बालकांना उबदार स्वेटर तसेच त्यांच्या मातांना ब्लँकेटची मदत केली. त्यानंतर तालुक्यातील शेंड्याचीमेट, विकासवाडी व पळसुंडा येथील गरीब गरजू आदिवासींना ब्लॅंकेटची भेट दिली. यावेळी नगराध्यक्ष अमोल पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक संजय बोधाडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भाऊसाहेब चत्तर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.