
वाचनाचा छंद जोपासणे आवश्यक : वीणा गवाणकर
विरार, ता. ३० (बातमीदार) : आजच्या आधुनिक काळात वावरताना तरुण पिढीने जाणीवपूर्वक वाचनाचा छंद जोपासणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध लेखिका वीणा गवाणकर यांनी वसई येथे केले. त्या वसई येथील अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयात मराठी भाषासंवर्धन पंधरवड्याच्या सांगता समारंभात बोलत होत्या.
वसई येथील विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयात पंधरा दिवस विविध भाषाकेंद्री तसेच साहित्यलक्ष्यी उपक्रमांनी सजलेल्या मराठी भाषासंवर्धन पंधरवड्याची सांगता शनिवारी सुप्रसिद्ध लेखिका वीणा गवाणकर यांच्या उपस्थितीत झाली. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांशी दिलखुलास संवाद साधला. आपले बालपण, शिक्षण, वाचन, लेखन, संदर्भशोध यासंबंधी, त्याचप्रमाणे एकूणच लेखिका म्हणून जडणघडणीबाबतचे अनुभव त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद उबाळे यांनी आजच्या तरुण पिढीत ज्ञाननिष्ठेची आणि आत्मियतेची जागा भौतिकवाद आणि आत्मकेंद्रितता घेत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. मात्र साहित्याचे वाचनच यातून तरुण पिढीला बाहेर काढील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मराठी भाषासंवर्धन पंधरवड्यानिमित्त महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे विविध स्पर्धा आणि उपक्रम यांचे आयोजन करण्यात आले. यात भित्तीपत्रक आणि घोषवाक्य स्पर्धा घेऊन मराठी भाषेसंबंधीची भित्तीपत्रके आणि घोषवाक्ये महाविद्यालय परिसरात प्रदर्शित करण्यात आली. मराठी विभागाच्या ग्रंथालयातील पुस्तकांचे प्रदर्शनही या पंधरवड्याच्या निमित्ताने मांडण्यात आले. शब्दकोडी, शब्दशोध यांसारखे खेळ, वक्तृत्व, निबंध, एकपात्री अभिनय, कथाकथन काव्यवाचन, कथालेखन यांसारख्या नेहमीच्या स्पर्धांबरोबरच श्रुतलेखन, प्रकटवाचन, स्टँड अप कॉमेडी, पत्रलेखन, महाराष्ट्र प्रश्नमंजूषा या अनोख्या स्पर्धांना विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.