
अनधिकृत बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर
कळवा, ता. ३० (बातमीदार) : कळवा, खारेगाव व विटावा परिसरात सध्या अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहे. सहायक आयुक्तांच्या आशीर्वादामुळे जवळपास २९ ठिकाणी अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. कळवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त व अधिकाऱ्यांकडून लाखो रुपये घेऊन धडक कारवाई न करता किरकोळ कारवाईचे नाटक करून त्यांना अभय देण्यात येत असल्याचे उघड झाले आहे. कळवा मुंब्राचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी कळवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर यांच्याशी अनधिकृत बांधकामांच्या संदर्भात जाब विचारण्यासाठी केलेला संवाद सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही क्लिप समाज माध्यमावर टाकल्याने ठाण्यात मोठी चर्चा सुरू असल्याने कळवा प्रभाग समितीतील अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे.
कळवा, खारेगाव परिसरात मोठ्या प्रमाणात सात मजली अनधिकृत इमारतींचे बांधकाम सुरू आहे; मात्र त्यावर कारवाई न करता विटावा परिसरात काही ठिकाणी दोन ते चार मजली इमारतींवर कारवाई करून प्लिंथ तोडण्याचे काम सुरू आहे. ही कारवाई आमदार जितेंद्र आव्हाड यांनी करण्यास सांगितल्याचे सहाय्यक आयुक्तांनी सांगितल्याने आमदार जितेंद्र आव्हाड संतप्त झाले. त्यांनी सह्ययक आयुक्त सुबोध ठाणेकर यांच्याशी फोनवरून संपर्क साधला व त्यांना या संदर्भात जाब विचारला या संभाषणाची क्लिप व्हायरल झाली आहे. यात सहायक आयुक्त सुबोध ठाणेकर यांनी अनधिकृत बांधकाम तोडू नये यासाठी विटावा येथील रोहिदास पाटील यांच्या कडून २० लाख रुपये घेतल्याचा आरोप केला आहे.
---------------
न्यायालयात पुरावे सादर करण्याचे आव्हान
कळवा परिसरात २९ अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. ती निकृष्ट दर्जाची असल्याचे स्पष्ट करून मुंब्र्यातील कोसळलेल्या इमारत दुर्घटनेत ८० जणांचा मृत्यू झाल्याची आठवण करून देण्यात आली आहे. मात्र सुबोध ठाणेकर यांनी पैसे घेतल्याचा इनकार केल्याने आव्हाड यांनी थेट न्यायालयात या संदर्भात पुरावे सादर करण्याचे थेट आव्हान दिले आहे. त्यामुळे कळवा प्रभाग समिती अतिक्रमण विभाग खडबडून जागा झाला असून अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. सोमवारी (ता. ३०) काही ठिकाणी कारवाईला सुरू करण्यात आली.
----------------
मुंबई-पुणे रस्त्यावरील इमारतीवर कारवाई
आमदार आव्हाड यांनी अनधिकृत बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आणल्यावर कळवा प्रभाग समिती अतिक्रमण विभाग खडबडून जागा झाला आहे. सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभाग पथकाने मुंबई-पुणे रस्त्यावर सुरू असलेल्या अनधिकृत इमारतीवर जेसीबीच्या सहाय्याने कारवाई सुरू केली आहे. या संदर्भात कळवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
------------
सहायक आयक्ताच्या आदेशाने अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई सुरू आहे. यापुढेही ती सुरू राहणार आहे.
- सोपान भाईक, अधीक्षक, कळवा प्रभाग समिती