''सकाळ'' सन्मान सोहळा

''सकाळ'' सन्मान सोहळा

Published on

चमचमत्या ताऱ्यांचा समृद्ध कलाविष्कार!
‘सकाळ सन्मान’ सोहळ्यात कलाकारांनी उमटवली मोहोर
मुंबई, ता. ३० : गेल्या काही वर्षांपासून मनोरंजनाची दर्जेदार आणि तितकीच देखणी मैफल ‘सकाळ सन्मान’ सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरत आली आहे. शनिवारी (ता. २८) प्रभादेवीतील रवींद्र नाट्यमंदिरात झालेल्या दिमाखदार सोहळ्यातही याची प्रचीती आली. महाराष्ट्र समृद्ध करणाऱ्या शिलेदारांचा एकीकडे गौरव होत असताना दुसरीकडे सादर होत असलेल्या नृत्य कलाविष्कारांनी आपल्या समृद्ध लोककलेचे दर्शन घडवले. चित्रपटसृष्टीतील तारे-तारकांनी सादर केलेल्या नृत्यअदांनी सोहळ्याला चार चाँद लागले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच मंत्रिमंडळातील काही मान्यवर आणि हिंदी-मराठी सिनेसृष्टीतील मनपसंत चेहऱ्यांची उपस्थिती ‘सकाळ सन्मान २०२३’ सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरले. महाराष्ट्राच्या समृद्ध विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांबरोबरच अभिनेत्री भूमी पेडणेकर, वाणी कपूर, मानुषी छिल्लर, अमृता खानविलकर आणि अभिनेता सोनू सूद यांचा सत्कारमूर्तींत सहभाग होता. सर्वांनीच पुरस्कारानंतर मनोगत व्यक्त करताना पत्रकारितेबरोबरच समाजहिताचा वसा जपणाऱ्या ‘सकाळ’च्या उपक्रमांचे कौतुक केले. आपल्या कर्तृत्वाची दखल घेऊन मानाचा पुरस्कार दिल्याबद्दल आभारही मानले. रेट्रो काळातील गाण्यांपासून लावणी, शिवाजी महाराजांची शौर्यगाथा, पोलिसांच्या कर्तृत्वाला सलाम ते अंगात चैतन्य जागवणारा पोवाडा आणि सोबतीला विनोदाची फोडणी अशा माहोलमध्ये रसिक प्रेक्षक रंगून गेले होते.
अभिनेत्री गिरिजा ओक आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांनी आपल्या दिलखुलास सूत्रसंचालनाने कार्यक्रमात रंगत आणली. अभिनेत्री पूजा सावंत, मृण्मयी देशपांडे, भार्गवी चिरमुले, शिवानी रांगोळे, अभिनेता आदिनाथ कोठारे, विराजस कुलकर्णी व अंकित मोहन यांचा नृत्याविष्कार आणि विनोदवीरांच्या विनोदाच्या फोडणीने धमाल आणली. रसिकांनी टाळ्यांचा गजर करीत नाट्यमंदिर डोक्‍यावर घेतले. शाहीर रामानंद उगले आणि त्यांच्या पथकाने सादर केलेल्या पोवाड्याने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाचे प्रसारण ‘झी टॉकीज’ वाहिनीवर लवकर करण्यात येणार आहे.

सांस्कृतिक सोहळ्यात लोकगीतांचा जागर
अभिनेता अंकित मोहन याने सादर केलेल्या शिवगौरवाने सोहळ्याची रंगतदार सुरुवात झाली. त्याने आपल्या सादरीकरणाने शिवाजी महाराजांना अभिवादन केले. त्यानंतर मृण्मयी देशपांडेने आपल्या नृत्याने महाराष्ट्र कृषी समृद्ध करणाऱ्या बळीराजाच्या कर्तृत्वाला सलाम केला. रंगमंचावरील अप्रतिम रोषणाईने तिचे नृत्य अधिकच निरखून गेले. प्रेक्षकांनी तिला मनमुराद दाद दिली. त्यानंतर हसण्याची उधळण करणारे प्रहसन सादर करण्यासाठी मंचावर अवतरली दिगंबर नाईक, पंढरीनाथ कांबळे, अभिजीत चव्हाण, प्राजक्ता हनमगर आणि नियती राजवाडे यांची टीम. त्यातील एक सरपंच, एक मास्तर आणि पत्रकार. मला अॅवॉर्ड द्या, असा आग्रह करत त्यांनी आपल्या प्रहसनात विनोदाचे फवारे उडवले. अनेक मनोरंजक किश्श्यांची मैफल रंगवत त्यांनी ‘सकाळ सन्मान’ महोत्सवाचे महत्त्व अधोरेखित करत तो मिळवण्यासाठी चांगली कामगिरी करण्याचा निर्धार करणारा संदेश दिला.

सुलोचनाताईंना मानवंदना
सुलोचनाताई चव्हाण आजही त्यांनी गायलेल्या लावण्यांच्या रूपात आपल्यात अजरामर आहेत. भार्गवी चिरमुलेने बहारदार लावण्या सादर करून सुलोचनाताईंना मानवंदना दिली. अभिनेता आदिनाथ कोठारे याने आपल्या सादरीकरणात महाराष्ट्र पोलिसांच्या कार्याचा गौरव केला. वर्दीतील पोलिसाने प्रसंगी आपले कुटुंब बाजूला ठेवून महाराष्ट्ररूपी परिवाराच्या संकटकाळात केलेल्या रक्षणाचे महत्त्व त्याने अधोरेखित केले. विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांनी रेट्रो लूकमध्ये सादर केलेल्या गाण्यांना रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. अभिनेत्री पूजा सावंतने रसिकांवर आपल्या नृत्याची मोहिनी घातली. गाजलेल्या गाण्यांच्या रिक्रिएट व्हर्जनवर तिने दिलखेचक सादरीकरण केले.
संगीत सोहळ्याचा कळसाध्यय गाठला तो लोकशाहीर रामानंद उगले आणि त्यांच्या पथकाने सादर केलेल्या पोवाड्याने. ‘माझा महाराष्ट्र कणखर’ महाराष्ट्रचा गौरव करणारा पोवाडा त्यांनी मोठ्या ताकदीने सादर केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा गजर होताच अवघे थिएटर टाळ्यांच्या कडकडाटात बुडून गेले. कार्यक्रमाची सांगता एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात होत होती आणि दुसरीकडे वन्स मोअरचा आग्रहही... पोवाड्यामुळे सभागृहात नवचैतन्य संचारले होते आणि तीच ऊर्जा घेत प्रेक्षकांनी सभागृह सोडले.


रेड कार्पेटवर ऋतुजा बागवे
अभिनेत्री ऋतुजा बागवे हिचीही कार्यक्रमास विशेष उपस्थिती होती. तिने रेड कार्पेटवर कलाकारांशी संवाद साधला. ‘सकाळ’चा उपक्रम आणि महाराष्ट्र समृद्ध करणाऱ्या सत्कारमूर्तींच्याही भावना तिने जाणून घेतल्या. कलाकारांना रॅपिड फायरमध्ये प्रश्न विचारून त्यांनी त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्नही केला.

भारतातून अनेक ललिता बाबर तयार व्हाव्यात!
सोहळ्यादरम्यान प्लॅनेट मराठी निर्मित आणि अमृता खानविलकर अभिनित आगामी ‘ललिता शिवाजी बाबर’ चित्रपटाचा टिझर लाँच करण्यात आला. ‘माणदेशी एक्स्प्रेस’ नावाने ओळखली जाणारी प्रसिद्ध धावपटू सुवर्णकन्या ललिता बाबर हिच्या जीवनावर आधारित सिनेमा प्लॅनेट मराठी घेऊन येत आहे. हलाखीच्या परिस्थितीवर आणि विविध संकटांवर मात करत तिने आपले सर्वोत्तम धावपटू बनण्याचे स्वप्न पूर्ण केले. अर्जुन पुरस्काराची मानकरी असलेल्या ललिताची संघर्षकथा आता चित्रपटरूपात येत आहे. तिच्या आयुष्यावर आधारित असलेला बायोपिक ‘ललिता शिवाजी बाबर’ची पहिली झलक पाहायला मिळाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते टिझरचे अनावरण करण्यात आले. आपले मनोगत व्यक्त करताना ललिता भावुक झाली. आनंदाश्रूंमुळे ती निशब्द झाली. तिचा कंठ दाटून आला तेव्हा प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात तिला दाद दिली. सर्वांचे आभार मानत ललिता म्हणाली, ‘‘माझ्या आयुष्यातील आज सर्वाधिक आनंदाचा क्षण आहे. मला बऱ्याच कठीण प्रसंगातून पुढे जावे लागले. आज माझ्या आनंदाचा दिवस, आज इथे साजरा होतोय त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. आज माझ्यावर येत असलेल्या चित्रपटाच्या टिझरचे अनावरण होत असल्याचे समाधान आहे. सिनेमात जे दाखवले गेले आहे ते पाहून मला वाटते की, माझ्यासारख्या अनेक ललिता बाबर भारतातून घडाव्यात. माझ्यापेक्षाही चांगली मेहनत करून त्यांनी देशासाठी कामगिरी करावी. आजच्या घटनेसाठी ‘सकाळ’लाही धन्यवाद!’’ ललिताची भूमिका साकारणाऱ्या अमृता खानविलकरनेही तिचे कौतुक केले. प्लॅनेट मराठीचे प्रमुख संस्थापक अक्षय बर्दापूरकर आणि एंडेमॉल शाईन इंडियाचे सीओओ गौरव गोखलेही या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com