संगीतकार नंदू घाणेकर यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संगीतकार नंदू घाणेकर यांचे निधन
संगीतकार नंदू घाणेकर यांचे निधन

संगीतकार नंदू घाणेकर यांचे निधन

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३० : संगीतकार नंदू घाणेकर यांचे वयाच्या ६५ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने सोमवारी (ता. ३०) सकाळी निधन झाले. मुलुंड येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ठाण्यातील बाळकूम स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

जाहिरात क्षेत्रातील प्रशस्त व्यक्तिमत्त्व असलेले गोविंद घाणेकर यांचे नंदू घाणेकर हे पुत्र आणि दिग्दर्शक गिरीश घाणेकर व डॉ. शुभा थत्ते यांचे धाकटे बंधू होते. घाणेकर कुटुंब पूर्वी दादर पूर्व येथील स्वामी नारायण मंदिरासमोरील पाम व्ह्यू इमारतीत राहायला होते. हे कुटुंब ज्या फ्लॅटमध्ये राहत होते, तेथे १९५० च्या दशकात लेखक बाळ सामंत विद्यार्थिदशेत राहत होते. तेथेच विद्यार्थ्यांनी तालमीच्या मैफली गाजवल्या होत्या. अशा वास्तूत नंदू घाणेकर लहानाचे मोठे झाले. पुढे काही काळाने दादर येथील घर सोडून घाणेकर कुटुंब ठाण्याच्या वेशीवर मुलुंड येथे वास्तव्यास आले.

नंदू घाणेकर हे रुईया कॉलेजचे माजी विद्यार्थी होते. महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांची नाळ संगीताशी जोडली गेली. घरात कलेचा वारसा असल्याने ते संगीत क्षेत्राकडे वळले. अभिनय आणि निर्मिती क्षेत्रातही त्यांनी कारकीर्द गाजवली असली तरी संगीतकार म्हणूनच ते सर्वांना परिचित होते. त्यांनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची दोन आध्यात्मिक गाणी रेकॉर्ड केली होती. मात्र त्याची सीडी कधीच प्रदर्शित झाली नाही. त्यानंतर ‘ताऱ्यांचे बेट’, ‘शाली’, ‘सुनंदा’, ‘नशीबवान’ या चित्रपटांना त्यांनी संगीत दिले होते.