
भूमिसेना व आदिवासी एकता परिषदेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
पालघर, ता. ३० (बातमीदार) : विकासाच्या नावावर येथील भूमिपुत्राला हद्दपार करण्यासाठी बुलेट ट्रेन, बडोदा एक्स्प्रेस-वे, वाढवण बंदरासह बिल्डर, भूमाफियांना सोयीचे होईल असे प्रकल्प लादण्यात येत आहेत. याचा निषेध करण्यासाठी भूमी सेना व आदिवासी एकता परिषदेने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
समुद्रात पाच हजार एकरावर भराव टाकून वाढवण बंदर उभारण्याचा घाट या सरकारने घातला आहे. यामुळे जिल्ह्यातील जवळचे डोंगर उद्ध्वस्त करण्यात येणार आहेत. यामुळे शेती व्यवसाय, मासेमारीसह पारंपरिक लघुउद्योग उद्ध्वस्त होणार आहेत. यामुळे येथील नागरिकांच्या भावना प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व भूमी सेनेचे काळूराम धोतडे यांनी केले.
आदिवासी समाजात थोड्याफार प्रमाणात मुले शिकली असून सरकारी नोकरी मिळवू पाहत आहेत; परंतु त्यांच्या नोकरीवर खोटे जात प्रमाणपत्र देऊन ७५ हजार बोगस आदिवासींनी दरोडा घातला आहे. आदिवासींना वनवासी म्हणणारे राज्यकर्ते धनगर समाजाला आदिवासींमध्ये समाविष्ट करण्याचा कट सरकारने रचला आहे. त्यामुळे आदिवासी आणि धनगर समाजात तेढ निर्माण केली जात आहे, याचा या मोर्चाच्या माध्यमातून निषेध व्यक्त करण्यात आला. मोर्चानंतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.