
रेल्वे फाटक उघडण्यासाठी प्रवाशांचा गोंधळ
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३० : जूचंद्र येथील रेल्वे फाटक दुरुस्ती कामामुळे बंद असताना सात प्रवाशांनी चार दिवसांपूर्वी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास उघडण्यासाठी गोंधळ घातला होता. तसेच रेल्वे फाटक नियंत्रकाला शिवीगाळ केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी सात जणांविरोधात डोंबिवली लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत पाच जणांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली.
जूचंद्र ते चंद्रापाडा रेल्वेमार्गादरम्यान देखभाल दुरुस्तीचे काम गुरुवारी (ता. २६) रात्री एक वाजल्यापासून रेल्वे तांत्रिक विभागाने हाती घेतले होते. रेल्वेचे वरिष्ठ तांत्रिक अधिकारी यांच्यासह कर्मचारी तेथे तैनात होते. दुरुस्ती कामामुळे जूचंद्र येथील रेल्वे फाटक बंद करण्यात आले होते. भिवंडी दिशेकडून एक मालगाडी दिवा स्थानकाकडे येण्यासाठी मार्गस्थ होत होती. या कालावधीत एका कारमधून सहा जण रेल्वे फाटकाजवळ आले होते. त्यानंतर एक दुचाकीस्वार आला. त्यांनी रेल्वे फाटक उघडण्यासाठी वाहनांचे हॉर्न वाजवले. दुरुस्तीचे काम सुरू असून भिवंडीजवळ एक मालगाडी उभी असल्यामुळे फाटक उघडता येणार नाही, असे नियंत्रक गुंजन सिंग यांनी सांगितले. मोटार, दुचाकीवरील वाहन चालक, प्रवासी रेल्वेमार्गात येऊन गोंधळ घालत शिवीगाळ करू लागले. रेल्वे सुरक्षा जवान उमेश कुमार यांनी प्रवाशांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला; मात्र काही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते.
मालगाडी थांबवण्याची वेळ
नागरिक आक्रमक झाल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याने वाढीव पोलिसांना पाचारण करण्यात आले. मालगाडी कामण स्थानकातून कोपर दिशेने निघाली असतानाही प्रवाशांचा गोंधळ सुरू होता. अखेर फाटक नियंत्रक सिंग यांनी आपत्कालीन परिस्थितीचा दर्शक देऊन मालगाडी थोपवून धरली. या गोंधळात चार वाजले आणि मालगाडी दोन तास उशिरा रवाना झाली. सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल रोहित विश्वकर्मा (वय ३४), साजन सिंग (वय २८), गौरव सिंग (वय १९), संतोष यादव (वय २७), विल्सन डिसोझा (वय २७), यांसह एक अनोळखी महिला आणि पुरुष अशा सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.