
सायनमध्ये टॉवरच्या सातव्या माळ्यावर आग
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : मुंबईच्या सायन-कोळीवाडा परिसरातील १९ मजली रहिवासी इमारतीच्या सातव्या मजल्यावर आग लागल्याची घटना आज घडली. मागील आठवड्यात दादर परिसरात गगनचुंबी इमारतीत आग लागली होती.
सायन-कोळीवाडा परिसरातील एमए रोडवरील ओम शिवशक्ती हाऊसिंग सोसायटीच्या सातव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये दुपारी १२.३० च्या सुमारास आग लागली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू केले. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. अग्निशमन दलाच्या चार गाड्या, एक जम्बो वॉटर टँकर आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आग मोठी नव्हती. आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
यापूर्वी दादर पूर्व येथे मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयासमोर नव्यानेच बांधण्यात आलेल्या आर. ए. रेसिडेन्सी या आलिशान गगनचुंबी इमारतीच्या ४२व्या मजल्यावर गुरुवारी २६ जानेवारीला रात्री साडेआठ वाजता आग लागली होती. मात्र इमारतीतील अग्निरोधक यंत्रणा कार्यान्वित नसल्यामुळे ही आग रोखण्यासाठी अग्निशमन दलाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता.