ऐरोलीत फेरीवाल्यांचा सुळसुळाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऐरोलीत फेरीवाल्यांचा सुळसुळाट
ऐरोलीत फेरीवाल्यांचा सुळसुळाट

ऐरोलीत फेरीवाल्यांचा सुळसुळाट

sakal_logo
By

घणसोली, ता. ३१ (बातमीदार) ः ऐरोली, सेक्टर १० परिसरात दिवसेंदिवस फेरीवाले आणि फेरीवाल्यांची वाहने यामध्ये वाढ होत चालली आहे. या परिसरात दाट लोकसंख्या असल्याने रहदारी मोठ्या प्रमाणात असते. मात्र, फेरीवाल्यांच्या वाढत्या मनमानीला स्थानिक नागरिक त्रासले आहेत. फेरीवाल्यांनी फूटपाथ अडवल्याने नागरिकांनी चालायचे कुठून, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

नवी मुंबई शहरात दिवसेंदिवस अनधिकृत फेरीवाल्यांची संख्या वाढत चालली आहे. या फेरीवाल्यांवर कोणतीही ठोस आणि कायमस्वरूपी कारवाई होत नाही. त्यामुळे नागरिक त्रासले आहेत. नवी मुंबईत बेलापूर, नेरूळ, वाशी, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, एरोली, दिघा या सर्वच भागात फेरीवाल्यांचा सुळसुळाट होताना सध्या पाहायला मिळत आहे. नवी मुंबई शहरात परवानाधारक कमी आणि विनापरवाना फेरीवाल्यांची संख्या वाढत आहे. यामुळे पदपथ, रस्त्याच्या कडेला, उद्यानांच्या बाहेर, रेल्वे स्थानकाबाहेर फेरीवाल्यांचा गराडा असल्याचा पाहायला मिळत आहे.
ऐरोली विभागातदेखील ही स्थिती अशीच असून ऐरोली विभागात फेरीवाल्यांवर अतिक्रमण विभाग मेहरबान असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. डी मार्टच्या बाहेर आणि ऐरोली सेक्टर १० परिसरात पदपथावर फेरीवाल्यांनी गराडा घातला आहे. पदपथावर येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना यामुळे मुख्य रस्त्यावरून चालण्याची वेळ येत आहे. तसेच ठिकठिकाणी ऐरोली विभागात खाद्य पदार्थांचे टेम्पोदेखील मोठ्या संख्येने पाहायला मिळतात. रहदारी असणाऱ्या परिसरात हे टेम्पो उभे असल्याने नागरिकांना दुहेरी कोंडीचा सामना करावा लागत आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने यावर लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.
---
ऐरोली विभागात असलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई सुरूच राहील.
- महेंद्र साप्रे, विभाग अधिकारी, ऐरोली