
नेरूळमध्ये अस्वच्छतेचे आगार
नेरूळ, ता.३१ (बातमीदार) ः शहरात स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत महापालिकेच्या माध्यमातून अनेक ठिकाणच्या कचराकुंडी हटवण्यात आल्या आहेत. कचरा संकलनासाठी घंटागाडीची सुविधा करण्यात आली आहे. परंतु, शहरात ज्या ठिकाणच्या कचराकुंडी हटवल्या आहेत, त्या ठिकाणी अजूनही कचरा टाकला जात आहे. त्यामुळे परिसरात अस्वच्छता निर्माण झाली आहे. महापालिका प्रशासनाने संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
असाच प्रकार रूप परिसरात पाहायला मिळत आहे. काही महिन्यांपूर्वी नेरूळमधील विभाग कार्यालयातून सेक्टर २ एलआयसी येथील कचराकुंडी हटवण्यात आली होती. कचराकुंडी नसल्याने नागरिक त्या ठिकाणी कचरा आणून टाकत आहेत. कचऱ्याचे योग्य वर्गीकरण होत नसल्याने महापालिकेच्या माध्यमातून बेलापूर ते दिघा भागातील झोपडपट्टी, गावठाण, सिडको वस्ती, रेल्वे स्थानक परिसर, मंडई परिसर अशा सर्वच सार्वजनिक ठिकाणच्या कचरा कुंड्या गेल्या काही वर्षांपासून टप्प्याटप्प्याने हटवण्यात येत आहेत.
नेरूळ सेक्टर १० येथील रस्ता स्थानकाकडे जाणारा रस्ता आहे. या रस्त्यावर तसेच पदपथावर लोकांनी कचरा टाकला आहे. रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेऊन येथे मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. त्यामुळे परिसराला बकाल रूप प्राप्त होत आहे. कुत्री, मांजरे हा कचरा इतरत्र पसरवत आहेत. त्यामुळे परिसरात अस्वच्छता पाहायला मिळत आहे. महापालिकाने घंटा गाडीची व्यवस्था करून देखील लोक नियम तोडून येथे कचरा टाकत आहेत. यामुळे सेक्टर १०,८,२ येथील परिसरात कचऱ्याचे ढीग दिसू लागले आहेत.
----------
कचराकुंडी हटवल्यामुळे नागरिका रस्त्यावर कचरा टाकत आहेत. स्थानकाकडे जाणारा हा मुख्य रस्ता आहे. त्यामुळे लोकांना कचऱ्यातूनच वाट काढत जावे लागत आहे. कचरा असल्यामुळे परिसरात डास वाढण्याची शक्यता आहे.
- ज्योती टोके, नागरिक
----------
महापालिका कर्मचारी रोज परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु लोकांचे सहकार्य यासाठी मिळत नाही. नियमांचे पालन लोकांकडून होत नाही. काही ठिकाणी कॅमेरे बसवण्यात आले आहेत. परंतु, तरी देखील लोक रात्रीचा फायदा घेऊन रस्त्यावर व पदपथावर कचरा टाकत आहेत. घंटागाडीच्या वेळा देखील वाढवण्यात आल्या आहेत. यामुळे लोकांनी घंटागाडीचा वापर करावा.
- बाबासाहेब रांजळे, उपायुक्त घनकचरा विभाग