
सायन्स कार्निव्हलला कल्याणकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कल्याण, ता. ३१ (बातमीदार) ः स्टेम प्रोजेक्ट, रोबोटिक्स, हायड्रोफोनिक्स, थ्री डी प्रिंटिंग, ऑटोमेशन यांसारख्या संकल्पना म्हणजे उद्याचे आपले भविष्य आहे. भविष्यातील या आणि अशाच प्रकारच्या विविध गोष्टींची पालक आणि मुलांना माहिती होण्यासाठी आयोजित केलेल्या जागतिक दर्जाच्या सायन्स कार्निव्हलला कल्याणकरांचा मोठा प्रतिसाद मिळाला. केंब्रिया इंटरनॅशनल स्कूल आणि कॉलेजने या सायन्स कार्निवलचे आयोजन केले होते.
बऱ्याचदा विज्ञान विषय म्हटले, की अनेकांना घाम फुटतो. मात्र मुलांना त्यांच्या कलेने आणि हसत खेळत एखादा विषय शिकवला, की त्यातून आवड निर्माण होण्यास मोठी मदत होते. नेमका हाच धागा पकडून या सायन्स कार्निवलच्या माध्यमातून केंब्रिया इंटरनॅशनलने अत्यंत किचकट विषयांचे सोप्या पद्धतीने सादरीकरण केल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे पहिल्या इयत्तेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांपासून ते थेट बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी यात वेगवेगळे प्रयोगांचे सादरीकरण केले.
भविष्यातील तंत्रज्ञान काय आहे, भविष्यातील करिअर आणि करिअरचे पर्याय काय आहेत, याची माहिती पालक आणि मुलांना होण्याच्या उद्देशाने हा सायन्स कार्निव्हल आयोजित केल्याचे पोटे ग्रुपचे सीएमडी बिपिन पोटे यांनी सांगितले. हा सायन्स कार्निव्हल यशस्वी करण्यासाठी केंब्रिया इंटरनॅशनलच्या संचालक मीनल पोटे, प्रिन्सिपल हिना फाळके, भूषण कुटे, अमोल शिंदे यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.