
आरोग्य वाहन पथक वाऱ्यावर
अलिबाग, ता. ३१ (बातमीदार) : शहरी व ग्रामीण भागातील शून्य ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील अंगणवाडी, शासकीय व निमशासकीय मुलांच्या आरोग्याची तपासणी डॉक्टरांच्या माध्यमातून केली जाते. या शाळांपर्यंत डॉक्टर, परिचारिकांची ने-आण करण्याचे काम कंत्राटी वाहनांमार्फत चालक करतात. परंतु, चार महिन्यांपासून नेमण्यात आलेल्या एजन्सीद्वारे या वाहनांचे भाडे मिळाले नाही. त्याचा फटका वाहनचालकांना बसत आहे. बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत सेवा देणारे वाहन पथक वाऱ्यावर असल्याचे दिसून येत आहे.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत मुलांच्या आरोग्याचे संवर्धन करण्याबरोबरच त्यांचा विकास साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून बालकांच्या आरोग्याची तपासणी करून त्यांच्यात आढळणाऱ्या आजारांना वेळीच पायबंध करण्याचा प्रयत्न केला जातो. नियोजन केलेल्या कार्यक्रमानुसार पथक अंगणवाडी, शाळांमध्ये जाऊन बालकांसह शाळांतील मुलांच्या आरोग्याची तपासणी करतात. या तपासणीत एखाद्या आजाराचे निदान झाल्यास तातडीने त्यावर उपचार अथवा यशस्वी शस्त्रक्रिया केली जाते. यासाठी सुमारे पाच लाखांपेक्षा अधिक खर्च येतो. हा सर्व खर्च सरकारकडून केला जातो. डॉक्टर, परिचारिका व औषध निर्माता यांची ने-आण करण्यासाठी नाशिक येथील महाराष्ट्र विकास ग्रुप कंपनीमार्फत ई-निविदाद्वारे भाड्याची वाहने घेण्यात आली आहे. एकूण ३० वाहने असून या वाहनांचे भाडे दर महिन्याला २३ हजार ६०० रुपये एजन्सीद्वारे दिले जाते. मात्र, सरकारने नेमलेली ही एजन्सी रायगड जिल्ह्यातील वाहनाचे भाडे अजूनपर्यंत देण्यास उदासीन ठरली आहे. ऑक्टोबरपासून जानेवारीपर्यंत या चार महिन्यांत सुमारे २८ लाख रुपयांचे भाडे प्रलंबित आहे. त्यामुळे वाहनचालकांसह मालकांनी एजन्सीच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे. वाहनांचे भाडे मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ लागली आहे. कर्ज काढून घेतलेल्या वाहनांचे हप्तेही देणे आता कठीण होऊन बसले आहे.
वयोगटानुसार तपासणी
शून्य ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या तपासणीमध्ये आढळणाऱ्या समस्या, जन्मत: असलेले व्यंग, लहान मुलांमधील आजार, जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे होणारे आजार आणि अपंगत्व आदींवर वेळेवर निदान करून त्यांच्यावर योग्य उपचार केले जात आहेत. जिल्ह्यातील अंगणवाड्यांमधील शून्य ते ६ वयोगटातील बालकांची तपासणी वर्षातून दोन वेळा केली जाते. पहिली तपासणी एप्रिल ते सप्टेंबर व दुसरी तपासणी ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत होते. तसेच शासकीय व निमशासकीय शाळांतील ७ ते १८ वयोगटातील मुलांची तपासणी वर्षातून एकदाच होते. या तपासणीसाठी एकूण ३० पथक तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक पथकामध्ये दोन वैद्यकीय अधिकारी, एक परिचारिका, औषध निर्माता अशा एकूण चार जणांचा समावेश आहे.
ग्रामीण व शहरी भागातील मुलांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी केली जाते. वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, औषध निर्माता यांना नेण्याचे काम करारनाम्यावर घेतलेल्या वाहनांद्वारे केले जाते. मात्र, ऑक्टोबरपासून भाडे देण्यास एजन्सी उदासीन ठरली आहेत. त्याचा नाहक त्रास आम्हाला होत आहे. याबाबत आमदार महेंद्र दळवी यांच्याकडे निवेदन दिले आहे.
- निकेश माळी, शिवसमर्थ वाहतूक सेवाभावी संस्था, रायगड
--------------------
बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत डॉक्टरांची ने-आण करण्यासाठी करारावर वाहने घेण्यात आली आहे. चार महिन्यांपासून त्यांचे भाडे थकले आहे. प्रलंबित भाड्याचा अहवाल सरकारला पाठवण्यात आला आहे.
- सुनील चव्हाण, समन्वयक, एनआरएचएम, रायगड