निधीअभावी रखडले रेल्वे एमयूटीपी प्रकल्प | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधीअभावी रखडले रेल्वे एमयूटीपी प्रकल्प
निधीअभावी रखडले रेल्वे एमयूटीपी प्रकल्प

निधीअभावी रखडले रेल्वे एमयूटीपी प्रकल्प

sakal_logo
By

मुंबई, ता. ३१ : मुंबईत उपनगरीय लोकलमधील प्रवाशांची वाढती गर्दी कमी करण्यासाठी आणि प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी ‘एमयूटीपी’ प्रकल्प-२ आणि ३ सुरू करण्यात आले आहेत. निधीअभावी हे प्रकल्प आजही पूर्ण झालेले नाहीत. केंद्र सरकारकडून यंदाच्या अर्थसंकल्पात एमयूटीपी प्रकल्पांसाठी निधी मिळावा, अशी अपेक्षा मुंबईकरांकडून केली जात आहे.

मुंबईमध्ये मध्य, हार्बर आणि पश्चिम या मार्गावर उपनगरीय सेवा चालवली जाते. मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कसारा, कर्जत-खोपोली, हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल, गोरेगाव या मार्गावर तर पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते विरार-डहाणूपर्यंत लोकल सेवा चालवली जाते. सर्वसामान्यांना लोकल प्रवास परवडत असल्याने दररोज ७० लाखांहून अधिक प्रवासी लोकलने प्रवास करतात. वाढत्या गर्दीमुळे दरवर्षी सरासरी अडीच हजार प्रवाशांचा मृत्यू होतो किंवा ते जखमी होतात.

याच पार्श्वभूमीवर गर्दी कमी करणे आणि प्रवाशांना अधिक सुविधा देण्यासाठी एमयूटीपी प्रकल्प-२ आणि ३ सुरू करण्यात आले आहेत; मात्र गेल्या दोन ते अडीच वर्षात केंद्र आणि राज्य सरकारकडून योग्य प्रमाणात निधी देण्यात आलेला नाहीत. त्यामुळे हे प्रकल्प आजही पूर्ण झालेले नाहीत, अशी माहिती रेल यात्री परिषदेचे अध्यक्ष सुभाष गुप्ता यांनी दिली. प्रकल्पांसाठी केंद्र सरकारकडून यंदाच्या अर्थसंकल्पात निधी मिळावा. तसेच प्रवाशांना सुविधा देताना त्यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या प्रकल्पांचा समावेश
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला ५-६ वी मार्गिका, (खर्च ६५९ कोटी) ठाणे ते दिवा पेअर लाईन (खर्च १३३ कोटी), बोरिवली ते मुंबई सेंट्रल ६ वी मार्गिका (खर्च ५२२ कोटी), गोरेगावपर्यंत मार्गिका विस्तार (खर्च १०३ कोटी), १९१ एसी लोकल, लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेससाठी कल्याण येथे सुविधा निर्माण करणे, कल्याण ते आसनगाव, कल्याण-बदलापूर दरम्यान ३ री आणि ४ थी मार्गिका.