कुंचल्याची सप्तरंगांना सलामी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुंचल्याची सप्तरंगांना सलामी
कुंचल्याची सप्तरंगांना सलामी

कुंचल्याची सप्तरंगांना सलामी

sakal_logo
By

मुंबई, ता. ३१ : बाळांपासून ते राजांपर्यंत सर्वांच्या आयुष्यात सप्तरंगांची पखरण करणाऱ्या कॅम्लिनच्या दांडेकर कुटुंबीयांना राज ठाकरे यांनी आज मनापासून धन्यवाद दिले आणि रेषांवर हुकूमत गाजवणाऱ्या कुंचल्याने जणू काही नवरंगांना सलामी दिल्याची उत्स्फूर्त भावना कलाकार रसिकांच्या मनात तरळली.

निमित्त होते ते दांडेकर कुटुंबीयांच्या कॅमल आर्ट फाऊंडेशनला पंचवीस वर्षे झाल्याच्या निमित्ताने आयोजित एका विशेष समारंभाचे. सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या साह्याने फाऊंडेशनतर्फे कलाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून ते सहा दिवस चालेल. जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये यानिमित्ताने आज झालेल्या समारंभात प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यावर राज ठाकरेंनी आपल्या छोट्याशा भाषणात दांडेकर कुटुंबीयांचे मनापासून आभार मानले.

माझ्या शालेय जीवनात कॅम्लिनची कंपासपेटी सगळ्यांकडे समानच होती. ती समानता पुढे कॅम्लिनच्या रंगांपर्यंत गेली. माझे बालपण चित्रकारांमध्येच गेले. त्या चित्रांमध्ये जरी विविधता असली, तरी रंगांमध्ये कॅम्लिनचे रंग ही एकमेव समानता होती. इतकी वर्षे कॅम्लिनने आमचे सर्व आयुष्य व्यापून टाकले होते. त्यामुळे दांडेकर कुटुंबीयांचे इतक्या वर्षांचे मानावयाचे राहिलेले आभार मी आता मानत आहे. तुमच्यामुळे आम्ही घडलो, शेकडो कलाकार घडले. त्यामुळे तुमचे आभार मानण्यासाठी मी येथे आलो आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी मला कुंचल्याचे फटकारे शिकवले; पण त्यांच्याही आयुष्यात तुम्हीच रंग भरले होते, अशा शब्दात राज ठाकरे यांनी दांडेकर कुटुंबीयांचे आभार मानले. या समारंभासाठी कोकुयो कॅम्लिनचे मानद अध्यक्ष सुभाष दांडेकर तसेच दिलीप व श्रीराम दांडेकर, आदिती दिलीप दांडेकर व राहुल दिलीप दांडेकर या दांडेकर कुटुंबीयांच्या तीन पिढ्याही तेथे आल्या होत्या. यानिमित्ताने दिवंगत रजनीताई दांडेकर यांच्या पोर्ट्रेटचे अनावरणही झाले. या निमित्ताने सुभाष दांडेकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या कॅमल आर्ट फाऊंडेशनच्या स्थापनेची हकिकतही सांगितली. कॅम्लिनचे उंटाचे बोधचिन्ह कसे ठरले, याचा किस्साही त्यांनी सांगितला.

------------
कॅम्लिनबद्दल कृतज्ञ
कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी कॅमल आर्ट फाऊंडेशनतर्फे मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात अजिंठा लेण्यांच्या सान्निध्यात कलाकारांचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. कॅम्लिनचा हा निर्णय अत्यंत चांगला असून असे उपक्रम महत्त्वाचे आहेत. मुलांना अजिंठामधील कलाकृतींचा अभ्यास करून बरेच शिकायला मिळेल. अशी शिबिरे त्यांनी सर्वत्र घ्यावीत, त्यातून नव्या कलाकारांना स्फूर्ती मिळेल, असे सांगून ज्येष्ठ कलाकार सुहास बहुलकर यांनी कॅम्लिनचे अभिनंदन केले. आपण चित्रकार म्हणून कॅम्लिनबद्दल कृतज्ञ आहोत. अशीच कृतज्ञता अनेक कलाकारांच्या मनात असेल, असेही ते म्हणाले.