
जिल्ह्यातील सुकन्येला समृद्धी योजनेचे पाठबळ
अलिबाग, ता. २ (बातमीदार) : स्त्री शक्तीचे सबलीकरण करण्यासाठी मुलींचे भवितव्य घडवणारी सुकन्या समृद्धी योजना डाक विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यात डाक विभागाचे अधीक्षक डॉ. संजय लिये यांच्या पुढाकाराने गावागावांत शिबिर घेऊन योजनेबाबत जनजागृती केली जात आहे. तळागाळापर्यंत ही योजना पोहचवण्यासाठी हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. एका दिवसात सुकन्या समृद्धी योजनेसाठी ५५७ खाती उघडण्यात आली असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त साधत हा उपक्रम सुरू केला आहे.
स्त्रीशक्तीचे सबलीकरण करण्यासाठी त्यांना प्रथम आर्थिक सक्षम करणे गरजेचे आहे. त्यातूनच सुकन्या समृद्धीसारख्या योजनेची निर्मिती झाली. ज्यात मुलीचा जन्म झाल्याने आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या कुटुंबात जो ताण येतो, तो नाहीसा व्हावा, हा योजनेचा उद्देश समोर ठेवण्यात आला आहे. मात्र, ही योजना सद्य:स्थितीत तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणे अत्यंत गरजेचे आहे. या योजनेची खरी गरज आदिवासी समाज, भटक्या-विमुक्त जाती, जमाती, आर्थिक दुर्बल घटकांना आहे.
अधीक्षक डॉ. संजय लिये यांनी रायगड विभागातील कर्मचारी वर्गाला सामाजिक जाणीवेचे धडे देत डाक विभागाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी चालना दिली. सर्व कर्मचारी वर्गांशी सुसंवाद साधून रायगड डाक विभागामार्फत प्रभातफेरी काढून जनजागृतीची मोहीम चालू केली आहे. एका दिवसात सर्वांत जास्त सुकन्या समृद्धी खाती काढल्याबद्दल राष्ट्रीय बालिका दिवस व प्रजासत्ताकदिनी झालेल्या कार्यक्रमात रायगड डाक विभागातर्फे संजना म्हात्रे यांचा गौरव केला. रायगड डाक विभागाचे नाव देशपातळीवर नेऊन रेसलिंग स्पर्धेत कांस्य पदक मिळवल्याबद्दल पूर्णिमा सातपुते यांचाही गौरव करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डाक विभागाच्या सर्व अधिकारी-कर्मचारी वर्गाने मेहनत घेतली.
काय आहे योजना?
मुळात शून्य ते १० वर्षातील मुलींच्या नावे २५० रुपये भरून हे खाते काढता येते. सलग १५ वर्षे त्यात पैसे भरावे लागतात. वर्षाला २५० रुपये भरले तरीही हे खाते चालू राहते. अगदी ५० रुपयेही या खात्यात भरता येतात. २१ वर्षे झाल्यानंतर त्याची परिपूर्ती होते. चक्रव्याज असल्याने भरलेल्या रकमेच्या तीनपट रक्कम त्या मुलीला मिळते. मुलीचे शिक्षण व लग्न हे दोन हेतू यातून पूर्ण करण्यास मदत होते. मुलीच्या लग्नासाठी हे खाते मुदतीपूर्वी बंद करण्याची सोय आहे. खाते धारकाचा मृत्यू झाल्यास पालकांना व्याजासह जमा रक्कम मिळते.
आवश्यक कागदपत्रे
* सुकन्या समृद्धी योजना (प्रपत्र) अर्ज
* मुलीचा जन्म दाखला
* पॅन कार्ड
* आधार कार्ड
* मतदार ओळखपत्र
* रेशन कार्ड, वीजबिल
(वरील कागदपत्रे पालकांची असावीत.)