
विद्यार्थ्याची गळफास घेउन आत्महत्या
कासा, ता. २ (बातमीदार) : तलासरीतील ज्ञानमाता आदिवासी माध्यमिक आश्रम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय झरी येथे मंगळवारी एका विद्यार्थ्याने बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अँलेस विनय लखन असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो तलासरी तालुक्यातील सावरोळी उधानपाडा येथील रहिवासी होता. अँलेस हा अकरावीच्या विज्ञान शाखेत शिक्षण घेत असून प्रेम प्रकरणाच्या नैराश्यातून त्याने ही आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. ॲंलेसला बाथरूममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहताच वसतिगृहातील कर्मचाऱ्यांनी त्याला बाहेर काढत ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्यावेळी त्याला डॉक्टरांकडून मृत घोषित केले. या प्रकरणी तलासरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे.