
वशेणी, पुनाडे, कडापेच्या नामफलकांचे अनावरण
उरण (बातमीदार) : उरण, पनवेल तालुक्यातील अनेक गावांमध्ये विद्युत रोषणाईने चमकणारे गावांचे नामफलक ठिकठिकाणी दिसून येत आहे. असेच आकर्षित नामफलक उरण तालुक्यातील वशेणी, पुनाडे, कडापे या तीन गावांमध्ये उभारण्यात आले आहे. केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर यांच्या संकल्पनेतून विद्युत रोषणाईने चमकणारे गावांच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. उरण तालुक्यात आतापर्यंत वेश्वी, वेश्वीवाडी, आवरे, सारडे, भोम, टाकी गाव या गावांच्या नामफलकांचे अनावरण झाले आहे. इतर अनेक गावांचे नामफलक तयार असून ते अनावरणच्या प्रतीक्षेत आहेत. राजू मुंबईकर यांनी पुनाडे गावचे हेमंत ठाकूर, वशेणी गावचे देविदास पाटील आणि कडापे गावचे गणेश म्हात्रे या युवा सामाजिक कार्यकर्त्यांच्या मागणीला मान देत या तिन्ही गावांचे विद्युत रोषणाईने चमकणारे नामफलक बनवून दिले. त्याचा अनावरण सोहळा नुकताच राजू मुंबईकर यांच्या हस्ते पुनाडे, वशेणी, कडापे या गावांत झाला. कार्यक्रमात रायगडभूषण, आगरी, कोळी, कराडी संघर्ष सामाजिक संस्था, पुनाडे, वशेणी, कडापे गावांतील ग्रामास्थ उपस्थित होते.