मुंबईतील हवा शुद्धीकरणासाठी पाच एअर प्युरिफायर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईतील हवा शुद्धीकरणासाठी पाच एअर प्युरिफायर
मुंबईतील हवा शुद्धीकरणासाठी पाच एअर प्युरिफायर

मुंबईतील हवा शुद्धीकरणासाठी पाच एअर प्युरिफायर

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : मुंबई महानगरातील प्रदूषणाचे प्रमाण घटण्यासाठी दिल्लीप्रमाणेच पाच ठिकाणी हवा शुद्धीकरण यंत्रे (एअर प्युरिफायर) लावण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त आय. एस. चहल यांना दिले आहेत. मुंबईत लागणाऱ्या या यंत्रांसाठी सुमारे १० कोटींचा खर्च महापालिकेकडून करण्यात येणार आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून ही उपकरणे लावण्यात येणार आहेत.

मुंबईतील प्रदूषण नियंत्रण आणि हवेची गुणवत्ता नियंत्रित राहण्यासाठी दिल्ली, गुरुग्राम, लखनौप्रमाणे एअर प्युरिफायर टॉवर बसवण्यात येणार आहेत. महानगरातील महापालिकेच्या शाळेत कौशल्य विकास केंद्र सुरू करणे, महापालिका प्रशासनात पारदर्शकता आणि शहराचे सौंदर्यीकरण या विषयांचा अंतर्भाव मुंबई महापालिकेच्या आगामी अर्थसंकल्पात करावा. मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेतानाच त्यांना सुशासनाचा अनुभव यावा, यासाठी विविध मुद्द्यांचा आणि उपाययोजनांचा समावेश करण्यात यावा, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना सांगितले आहे. त्याचबरोबर शहरी वनीकरण वाढेल, यासाठी उपाययोजना करण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

या ठिकाणी लागणार यंत्रे
दहिसर टोल नाका, मुलुंड चेकनाका, अमर महाल जंक्शन, वरळी जंक्शन, कलानगर या वाहतूक कोंडी असणाऱ्या पाच ठिकाणी हवा शुद्धीकरण यंत्रे लावण्यात येणार आहेत. सक्शन पंपाच्या साह्याने वातावरणातील प्रदूषित हवा खेचून शुद्ध हवा बाहेर सोडण्याचे काम ही उपकरणे करणार आहेत.

रुग्णांची घरोघरी जाऊन तपासणी
शहरातील सुमारे २७ टक्के नागरिक मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या विकारांनी ग्रस्त आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून त्यांची घरोघरी जाऊन तपासणी करावी, त्यांचा डेटा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये बाह्यरुग्ण विभागावर गर्दी होत असल्यामुळे ताण कमी करण्याकरिता खिडक्यांची संख्या वाढवावी. एमआरआय, सीटीस्कॅन आणि निदान केंद्र वाढवण्याच्या, तसेच डायलिसिस केंद्र उभारण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या.